मुंबई : राज्यातील आॅटोरिक्षा-टॅक्सी भाडे सूत्र ठरवण्यासाठी संगणकीय सर्वेक्षण करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे. रिक्षा, टॅक्सी सर्व्हे नमुने www.transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर आॅनलाइन भरणा करण्यासाठी अपलोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. भाडे सूत्र ठरवण्यासाठी शासनाकडून समिती नेमण्यात आली आहे. राज्यातील विविध ठिकाणी बैठका घेऊन, रिक्षा, टॅक्सी संघटनाचे मत व ग्राहक प्रतिनिधी यांची मते जाणून घेण्यात येत आहेत. या दरम्यान, विविध मुद्द्यांवर संघटना, ग्राहक प्रतिनिधींनी दिलेल्या मतांमध्ये मतभिन्नता आढळून आली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी व्यावसायिक, संघटना, तसेच जनतेला त्यांची मते समितीकडे मांडता यावीत, यासाठी संगणकीय सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने जनतेचा अभिप्राय, रिक्षा व टॅक्सी चालकांचा अभिप्राय, संघटनांचे अभिप्राय सर्वेक्षण करण्यासाठी वेबसाइटवर मेन मेनूमध्ये सूचना आणि त्यानंतर फीडबॅक फॉर्म यानुसार मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये आॅनलाइन भरणा करण्यासाठी अपलोड केल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
भाडे सूत्र ठरविण्यासाठी आता संगणकीय सर्वेक्षण
By admin | Published: April 19, 2017 1:08 AM