Join us

कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:07 AM

मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने ...

मुंबई : ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्या कॉम्रेड सुंदर नवलकर यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने भारतीय कम्युनिस्ट चळवळीचा धगधगता अंगार विझल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

कम्युनिस्ट चळवळीच्या अत्यंत कर्मठ, लढाऊ नेत्या अशी त्यांची ख्याती होती. नवलकर या निष्णात वकील होत्या. सर्वसामान्य माणसांच्या हक्कांसाठी न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर त्यांनी अनेक लढाया लढल्या. लढवय्येपणा, अफाट बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हजारो कामगारांचे संघटन केले. १९७४ साली ऐतिहासिक रेल्वेच्या संपात त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर पोहोचले.

महाराष्ट्रात डावी चळवळ रुजविण्यात नवलकर यांचे मोलाचे योगदान होते. कॉम्रेड सुनील दिघे आणि लक्ष्मण पगार यांच्यासमवेत त्यांनी सी.पी.आय. (एम.एल.) महाराष्ट्र समिती सुरू केली. आणीबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दलित पँथरमध्येही त्यांच्या कार्याचा प्रभाव दिसून आला.

भारतीय कम्युनिस्ट पक्षात (मार्क्सवादी-लेनिनवादी) नवसंशोधनवादी विचारसरणी रुजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. डिसेंबर, १९७८ मध्ये सीपीआय (एमएल)ची मध्यवर्ती फळी तयार करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १००व्या वर्षीही त्या सक्रिय होत्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी काम केले.