Join us  

स्मितामुळे सौंदर्याच्या रूढ संकल्पना दुय्यम

By admin | Published: October 17, 2015 2:18 AM

रुपेरी पडद्यावर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठात शुक्रवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई : रुपेरी पडद्यावर अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त मुंबई विद्यापीठात शुक्रवारी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात स्मिता पाटील यांच्यामुळे सौंदर्याच्या रूढ संकल्पना दुय्यम ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाच्या ‘डीसीजे फिल्म क्लब’च्या वतीने स्मिता पाटील यांची ६० वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप, स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर, मैथिली राव आणि स्मिता पाटील यांची बहीण अनिता पाटील-देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. रुपेरी पडद्यावर आपल्या कसदार अभिनयाने सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळे स्थान आहे. अभिनयातून साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह स्मिता पाटील यांनी अभिव्यक्त केले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.या वेळी नांदगावकर म्हणाले की, एका सुशिक्षित समाजवादी कुटुंबातून आलेल्या स्मिताला सामाजिक प्रश्नांचा कळवळा होता. स्त्रियांच्या प्रश्नांकडे ती वेगळ्या नजरेने पाहायची. म्हणूनच तिने साकारलेल्या उंबरठा, मिर्च मसाला या चित्रपटांकडे महिलावर्गासोबत तमाम प्रेक्षकांचे लक्ष वेधले. तिचे शक्ती, नमक हलाल हे व्यावसायिक चित्रपटही सुपरहिट ठरले.ऐंशीच्या दशकातील समांतर चित्रपटांच्या लाटेने समाजातील अनेक प्रश्नांना डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनू लागले. त्याच पार्श्वभूमीतून ‘मंथन’मधून स्मिताने सहकारी चळवळीत सक्रिय झालेल्या स्त्रीच्या व्यक्तिरेखेमधील संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्याचे मैथिली राव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)