दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर ‘मॉडेल शाळेची’ संकल्पना
By Admin | Published: July 2, 2014 12:19 AM2014-07-02T00:19:15+5:302014-07-02T00:19:15+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या शाळांची दुरवस्था आणि घटत जाणारी पटसंख्या पाहता प्रत्येक प्रभाग क्षेत्रात मॉडेल शाळा उपक्रम राबवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या शाळांची दुरवस्था आणि घटत जाणारी पटसंख्या पाहता प्रत्येक प्रभाग क्षेत्रात मॉडेल शाळा उपक्रम राबवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु शिक्षण मंडळाचा उदासीन कारभार पाहता ही संकल्पना कितपत अमलात येईल, याबाबत साशंकता आहे.
आजघडीला केडीएमसी क्षेत्रात ७४ शाळा आहेत. यातील काही शाळा या जुन्या असल्याने त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. मागील वर्षी शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या दौऱ्यात काही शाळांचे गळके छप्पर, त्यातून बरसणाऱ्या पावसाच्या धारा, वीज नाही, अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची बाब समोर आली होती. त्यावेळी या विदारक स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ परंतु वास्तव पाहता या परिस्थितीत आजही फारसा फरक पडलेला नाही. डोंबिवलीतल्या एका धोकादायक शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्यत्र करण्यात आलेले स्थलांतर हे नुकतेच घडलेले ताजे उदाहरण आहे. मोहने येथील डॉ़ सर्वपल्ली राधाकृष्णन या पालिकेच्या तामिळ माध्यमाच्या शाळेचीदेखील अशीच दुरवस्था झाली. शाळेचे छत केव्हाही कोसळेल, या भीतीच्या सावटाखाली विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केडीएमसी शाळांच्या स्ट्रक्चरल आॅडिटबाबत उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)