महाराष्ट्रात सध्या कंगना राणौत विरुद्ध संजय राऊत असा वाद सुरू आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून बॉलिवूड क्विन कंगनानं सातत्यानं मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर मिळाले. त्यात कंगनानं मुंबई पोलिसांवर टीका करताना मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर वाटू लागलं आहे, असे वादग्रस्त विधान केले. या विधानानंतर तिच्यावर टीका होऊ लागली. त्यातही कंगनानं 9 सप्टेंबरला मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिम्मत असेल, तर अडवा असं आव्हान शिवसेनेला दिले. त्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापू लागलं आहे.
ऐकिकडे कंगना अशी विधानं करत सुटली असताना, तिच्या वडिलांना मात्र तिच्या सुरक्षिततेची चिंता सतावू लागली आहे. कंगनाचे वडील अमरदीप सिंह राणौत यांनी कंगनाच्या सुरक्षिततेसाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. ते कंगनाला भेटण्यासाठी मनालीला जाणार आहेत आणि मुंबईत जाण्यावरून तिच्याशी ते चर्चाही करणार आहेत. कंगनाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. कंगनाच्या सुरक्षिततेच खाजगी सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
भाजपा नेताने दिला पाठिंबाशिवसेनेचे नेते कंगनाला आव्हान देत असताना हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे आमदार कर्नल इंद्र सिंह यांनी जोरदार टीका केली आहे. सरकाघाट विधानसभा क्षेत्रातील आमदार कर्नल इंद्र सिंह यांनी मुंबई कुणाच्या बापाची मालमत्ता नाही, असे विधान केलं आहे. ते पुढे म्हणाले,''मुंबईत जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा शिवसेना व संजय राऊत कुठे होते? देशातील प्रत्येक कोपऱ्यातील वीरांनी तेव्हा मुंबईसाठी प्राणाची आहुती दिली. मुंबईवर सर्वांचा हक्क आहे. कंगनाला धमकी देऊन संजय राऊत यांनी त्यांच्या संकुचित मानसिकतेची प्रचिती दिली. कंगना वाघिण आहे, गिधाडं तिचं काही बिघडवू शकत नाहीत.''
आज कशावरून सुरू झाला वाद?"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा", असा एल्गार कंगनाने केला.
संजय राऊत यांनी सुनावलं"मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगना राणौतवर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?" असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.