ऐन पावसाळ्यात तलाव क्षेत्रात जमले चिंतेचे ढग; केवळ ५३ टक्केच जलसाठा शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:35 AM2019-07-23T04:35:38+5:302019-07-23T04:37:03+5:30
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा असणे आवश्यक असते. मात्र, गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दगा दिला.
मुंबई : तलाव क्षेत्रात ५० टक्के जलसाठा जमा होताच पाणीकपात मागे घेण्याचा दबाव पालिका प्रशासनावर वाढू लागला. राज्य सरकारनेच तशी सूचना केल्यानंतर गेल्या आठवड्यात पाणीकपात रद्द करण्यात आली, परंतु तलाव क्षेत्रातून पावसाने गेल्या काही दिवसांमध्ये पळ काढला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात संपत आला, तरी तलावांमध्ये ५३ टक्केच जलसाठा असल्याचे चिंतेचे ढग पुन्हा एकदा मुंबईवर दाटले आहेत.
मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा असणे आवश्यक असते. मात्र, गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे महापालिकेला १५ नोव्हेंबरपासून मुंबईत दहा टक्के पाणीकपात लागू करावी लागली. या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर, शेवटच्या दोन दिवसांत पाऊस बरसला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे तलावांमधील जलसाठा झटपट वाढला.
तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा होताच पाणीकपात रद्द करण्याची मागणी नगरसेवकांकडून होऊ लागली. राज्याचे नगरविकासमंत्री योगेश सागर यांनी गेल्या आठवड्यात पाणीकपात मागे घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, पालिकेने गेल्या शुक्रवारपासून दहा टक्के पाणीकपात रद्द केली. मात्र, गेल्या दोन वर्षांत जुलै महिन्यात तलावांमध्ये ८० टक्के जलसाठा असताना, सध्या केवळ ५३ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करणे महागात पडण्याची शक्यता आहे.
२२ जुलै २०१९
तलाव शिल्लक जलसाठा
(दशलक्ष लिटर्स)
अप्पर वैतरणा ३,१३५
मोडक सागर १,०४,०२७
तानसा १,२२,४०४
मध्य वैतरणा १,४०,१०१
भातसा ३,५५,९६४
विहार १६,२०७
तुळशी ८,०११