मुंबई : कोरोना, बेरोजगारी, महागाई, इंधन दरवाढ, राजकारण या मुद्द्यांवर मात करीत सध्या देशभरात सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद होणार का..? कारण केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी दिलेली मुदत उलटल्याने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर बंदीची टांगती तलवार आहे. त्यामुळे समाजमाध्यमवीर मात्र चिंतित झाले आहेत.
आजची पिढी दिवसातील बहुतांश वेळ समाजमाध्यमांच्या सान्निध्यात घालवते. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे सर्वांत वेगवान साधन असल्याने ही माध्यमे मानवाच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनली आहेत. त्यामुळे ती बंद होणार असल्यास प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते.
सोशल मीडिया बंद झाल्यास काय करायचे, दुसरे पर्याय काय, या माध्यमांइतकी त्यांची क्षमता आहे का, अशा चर्चा मंगळवारसह बुधवारी दिवसभर सुरू होत्या. हा सोशल विरह सहन होणार नसल्याने अनेकांनी महत्त्वाच्या पोस्ट, खास मित्रांसोबत मारलेल्या गप्पा, सर्वाधिक लाइक-शेअर-कमेंट मिळालेले फोटो यांचे स्क्रीनशॉट काढून ठेवले. काही जणांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या मित्रांसोबत कायमस्वरूपी संपर्कात राहण्यासाठी त्यांचे मोबाइल क्रमांक घेतले. काहींनी तर शासनाला भावनिक साद घालत बंदीबाबत विचारही न करण्याची विनंती केली.
ऊठ अनारकली ऊठ... पटापट फोटो पोस्ट करून घे!
या बंदीच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झालेले मीम्स पोट धरून हसायला लावणारे आहेत. ‘ऊठ अनारकली ऊठ... फेसबुक बंद होणार आहे, पटापट फोटो पोस्ट करून घे’, ‘फेसबुक होतं तर लोकांना बड्डे तरी कळायचे, झाला ब्वा माझा... बाकिच्यांनी बघा कै ते!’, ‘माझे ४९९९ फॉलोअर्स आहेत... ५००० झाल्यावरच फेसबूक ढासळूदेत’ अशा मीम्ससह एकापेक्षा एक विनोदी फोटोंनी सोशल मीडियावर दिवसभर धुमाकूळ घातला होता.
रोजगार द्या किंवा सोशल मीडिया सुरू ठेवा!
शिक्षण पूर्ण होऊन रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांनीही या चर्चेत सहभाग घेतला. एकतर रोजगार द्या किंवा सोशल मीडिया सुरू ठेवा, अशी थेट भूमिका त्यांनी मांडली. लॉकडाऊनमुळे मनोरंजनाची साधने मर्यादित झाली असताना आमच्या हक्काचे व्यासपीठ का हिरावून घेता, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला.