मानसिक आरोग्य, रोजगार आणि शिक्षणाच्या चिंतेने तरुणाईला ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 04:38 AM2020-08-12T04:38:23+5:302020-08-12T04:38:32+5:30
ओईसीडीचे सर्वेक्षण; ५५ टक्के युवा मानसिक आरोग्याचे बळी
- सीमा महांगडे
मुंबई : सध्याच्या काळात आपल्या मानसिक आरोग्याची काळजी सर्वाधिक आहे. काही गरीब देशांतील युवकांना त्यांच्या नोकऱ्या आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याची काळजी आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांना या कोविड १९ च्या जगभर पसरलेल्या विषाणूमुळे संसर्ग होण्याची किंवा त्यामुळे आजारी पडण्याची काळजी सर्वांत कमी वाटत आहे. जगभरातील १५ ते २४ या वयोगटातील ५५ % अधिक युवांना मानसिक आरोग्य, रोजगार आणि त्यासंबंधित उद्भवणाºया समस्या महत्त्वाच्या असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणावरून अधोरेखित करण्यात आला आहे. मानसिक आरोग्यानंतर वाढणारी बेरोजगारी आणि शिक्षणाशी तुटणारा संपर्क यांची चिंता तरुणाईला सगळ्यात जास्त भेडसावत आहे.
जगाच्या ४८ देशांतील १५ ते २४ वयोगटातील युवक-युवतींचे सर्वेक्षण केल्यानंतर ओईसीडी (आॅर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-आॅपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट) या संस्थेच्या निकषांच्या यादीवर ही बाब आढळून आली. कोरोनाची सुरुवात झाल्यापासून मानसिक आरोग्य आणि त्यासंबंधित असणाºया समस्यांना जगातील प्रत्येकाला तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: रोजगार गमावणे, त्यामुळे येणारा मानसिक तणाव, आर्थिक परिस्थिती यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे उत्तर सर्वेक्षणादरम्यान युवकांनी नोंदविले आहे. दरम्यान, शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्याने या तणावात भर पडली असल्याचेही नमूद करण्यात आले.
ओईसीडी संस्थेने आपल्या सर्वेक्षणादरम्यान यंग माईंड या संस्थेच्या सर्वेक्षणाचाही दाखला दिला आहे, ज्यानुसार ८० % तरुण वर्गाला कोविड १९ च्या दरम्यान आपल्याला मानसिक समस्यांचा सामना करावा लागला असल्याचे मान्य करण्यात आले आहे.
युनेस्कोच्या आकडेवारीनुसार, जगातील अर्ध्याहून अधिक देशांनी शैक्षणिक संस्था कोरोनाच्या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी व त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे
शिक्षणावर परिणाम झाल्याने पुढील काही काळात शिक्षण घेत असलेल्या जगातील असंख्य विद्यार्थ्यांचे १० ट्रिलियन डॉलर्स इतके नुकसान उत्पन्नात होणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेकडून बांधण्यात आला आहे.