Join us

चिंता वाढली, राज्याने पुन्हा ओलांडला दहा हजार रुग्णांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, शुक्रवारी दिवसभरात राज्यातील रुग्ण संख्येने पुन्हा १० हजारांचा टप्पा ओलांडला ...

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, शुक्रवारी दिवसभरात राज्यातील रुग्ण संख्येने पुन्हा १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एका दिवसात राज्यात १०,२१६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १,२२५ रुग्ण हे नागपूरमध्ये नोंदण्यात आले आहेत. तर, मुंबईत १,१७४ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत झाले असतानाच कोरोनाच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेसमोर मोठी समस्या उभी केली आहे. राज्यातील एकूण रुग्णांचे प्रमाण जानेवारी महिन्यात दोन ते अडीच हजार रुग्णांच्या घरात आले होते. फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली. गेले काही दिवस ती आठ ते नऊ हजारांपर्यंत होती. शुक्रवारी रुग्णसंख्येने १० हजारांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी ऑक्टोबर २०२०मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा १० हजारांवरून हळूहळू खाली येऊ लागला होता.

वाढत्या रुग्णसंख्येत मुंबई महानगरातून २१३५, पुणे ८४९, पिंपरी ५४९, अमरावती ४३५, नाशिक ३५२, औरंगाबाद ३१८, जळगाव ३१५ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात राज्यात ६,४६७ रुग्ण बरे झाले. आताच्या घडीला राज्यात ८८,८३८ एवढे ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ४,२०३ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. एकूण चार लाख १० हजार ४११ रुग्ण हे घरगुती विलगीकरणात आहेत. आज मृत्यू नोंदण्यात आलेल्या ५३ मृत्यूंपैकी २८ मृत्यू हे गेल्या ४८ तासांतील आहेत. तर १६ मृत्यू हे गेल्या आठवड्यातील आहेत. ९ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीचे आहेत.