संदीप शिंदे
मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यात पालिकांची यंत्रणा व्यस्त असल्याने सालाबादप्रमाणे शहरांतील धोकादायाक इमारतींची यादी प्रसिध्द करून दुरूस्तीच्या नोटीसा त्यांना बजावता आलेल्या नाहीत. त्यामुळे अतिधोकादायक श्रेणीतील इमारतीतल्या रहिवाशांच्या स्थलांतरासह उर्वरित इमारतींची दुरूस्ती यंदा सुरूच होऊ शकली नाही. पावसाळ्यात या इमारतींच्या पडझडीचा धोका वाढण्याची भीती असल्याने अनेक रहिवाशांना जीव मुठीत धरून जगावे लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार दरवर्षी पालिका हद्दितल्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करून पालिका त्यांची यादी प्रसिध्द करते. ज्या इमारतींची दुरूस्ती अशक्य आहे (सी- १ श्रेणी) तिथल्या रहिवाशांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून इमारत पाडली जाते. सी – २ ए श्रेणीतल्या रहिवाशांना इमारतीबाहेर काढून इमारतींची दुरूस्ती केली जाते. त्यानंतर त्यांना पुन्हा वास्तव्याची मुभा दिली जाते. तर, सी आणि सी – ३ श्रेणीतल्या इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य असताना दुरूस्ती कामे केली जातात. परंतु, मुंबई महानगर क्षेत्रातल्या कोणत्याही महापालिकांनी यंदा ती यादी प्रसिध्द केलेली नाही. पालिकांची पथके साधारणतः मार्च एप्रिल महिन्यांत ही यादी प्रसिध्द करतात आणि कलम २६४ किंवा २६८ अन्वये नोटीसा धाडल्या जातात. त्यानंतर संबंधित सोसायट्यांपैकी बहुसंख्य ठिकाणी कंत्राटदारांची नियुक्ती करून दुरूस्तीकामे केली जातात. परंतु, कोरोना संकटामुळे या इमारतींची दुरूस्ती प्रक्रियाच सुरू झालेली नाही.
अनेक सोसायट्यांकडून स्ट्रक्चरल आँडीट करून घेतले जाते. त्यांनी इमारतीचे आयुष्यमान वाढविम्यासाठी सुचविलेली कामे एप्रिल आणि मे महिन्यांतच केली जातात. मात्र, त्यासाठी पालिकेकडून आवश्यक असलेल्या परवानग्या अनेकांना मिळवता आलेल्या नाहीत. तसेच, काही जणांनी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांची नियुक्तीसुध्दा केली होती. मात्र, कोरोनामुळे आलेले निर्बंध साहित्य पुरवठ्यातील अडचणी आणि मजूरांचा आभाव यामुळे कुठेही दुरूस्तीची कामे सुरू करता आली नसल्याची माहिती वास्तूविशारद संदीप प्रभू यांनी दिली.
गळतीसुध्दा वाढणार
इमारतींमध्ये होणारी गळती थांबविण्यासाठी अनेक ठिकाणी शेड उभारली जाते तसेच उन्हाळ्यात छतांवर डांबर लावले जाते. मात्र, ती कामेसुध्दा यंदा झाली नसल्याने अनेक ठिकाणी यंदा गळतीची समस्या उग्र रूप धारण करण्याची चिन्हे आहेत. वास्तविक सरकारने इमारतींच्या तातडीच्या दुरूस्ती कामांना परवानगी दिली आहे. मात्र, हे काम करताना येणा-या अडचणींचा विचार करता कुणीही ते सुरू करण्याची हिम्मत दाखवली नसल्याचेही संदीप प्रभू यांनी सांगितले.
यंदाच्या पावसाळ्यात धोका जास्त
दुरूस्तीत झालेल्या हलगर्जीमुळे दर पावसाळ्याच इमारतींची पडझड होत असते. यंदा अनेक इमारतींना दुरूस्तीच करता आलेली नाही. इमारतीची स्ट्रक्टरल स्टेबिलिटी तपासणीची कामे सुध्दा लांबणीवर पडली आहेत. कोरोना संकटामुळे ओढावलेली ही परिस्थिती धोकादायक इमारतींबाबतची चिंता वाढवणारी आहे. अतिधोकादायक श्रेणीतल्या इमारतींमधिल रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करणे अत्यावश्यक आहे.
- संजीवकुमार धामसे, स्ट्रक्चरल इंजिनिअर