मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अंशत: टाळेबंदी करण्यात आली. पुणे, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या काही शहरांमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर वेळेचे निर्बंध आल्याने आता पुन्हा एकदा व्यवसायाला झळ बसण्याची चिंता व्यक्त करण्यात येते आहे. मागील वर्षी टाळेबंदीपायी या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला संघर्ष करावा लागला. भविष्यातील टाळेबंदी या क्षेत्राचा घास घेईल अशी भावना हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने व्यक्त केली आहे. कोणताही कडक निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने व्यावहारिक बाजूने विचार करावा असे आवाहन करण्यात आले.
हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष शेरी भाटिया म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या पाहिजे. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री शासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेला सहकार्य करत आहे. मॉल, शॉपिंग सेंटर्स, किराणा दुकाने, सार्वजनिक वाहतूक अगदी विमानतळांच्या तुलनेतही हॉटेल व रेस्टॉरंट सुरक्षित जागा आहे. येथे जागेचे व्यवस्थापन शक्य आहे. टेबल आणि खुर्च्यांची सोय सामाजिक अंतराचे भान राखूनच करण्यात येते. दरवेळी एन्ट्री आणि एक्झिट ठिकाणी व्यक्तींची देखरेख असते. अगदी अंतर्गत भागातही कर्मचारी वर्ग सर्व ती काटेकोर काळजी घेत असतो. मागील वर्षी टाळेबंदीचा मोठा फटका या क्षेत्राने सहन केला. मात्र यावेळी अंशत: टाळेबंदीतही हॉटेल व रेस्टॉरंट क्षेत्र तग धरू शकणार नाही. राज्य शासनाने घाईघाईने निर्णय घेऊन टाळेबंदी लादू नये अशी विनंती आहे.
तीस टक्के रेस्टॉरंट बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाच्यावतीने सर्व सदस्यांकरिता एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. प्रशासनाने आखून दिलेल्या एसओपींचे पालन करण्याविषयीचा सल्ला या माध्यमातून देण्यात आला. महाराष्ट्रात एकूण २१०००० रेस्टॉरंट आहेत. त्यापैकी सुमारे ३० टक्के रेस्टॉरंट कर्ज आणि आर्थिक नुकसानापायी बंद करावी लागली आहेत. व्यवसाय आणि कामकाजात करण्यात आलेले लहान-सहान बदल महसुलावर मोठा परिणाम करत आहेत, अशी माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी यांनी दिली.