संत जनाबाई यांच्या भक्तिगीतांची मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:09 AM2021-03-04T04:09:47+5:302021-03-04T04:09:47+5:30
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रविवार, ७ मार्चपासून ‘संतप्रिया’ मालिकेत जनी म्हणे... ही भक्तिसंगीत मैफल सादर केली जाणार ...
मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रविवार, ७ मार्चपासून ‘संतप्रिया’ मालिकेत जनी म्हणे... ही भक्तिसंगीत मैफल सादर केली जाणार आहे. दर रविवारी सकाळी ९ वाजता जनी म्हणे या मालिकेद्वारा संत कवयित्री जनाबाई यांच्याविषयीचे १२ भाग यू-ट्युब आणि इतर सोशल मीडियावर सादर होतील.
पं. शिवानंद पाटील यांच्या षष्ट्यब्दपूर्तीच्या निमित्ताने ही भक्तिसंगीत मैफिल सादर होत आहे. या मालिकेची संकल्पना, निर्मिती आणि गायन योजना शिवानंद यांचे आहे. तरुण पिढीतील गायिका सानिका देवधर आणि स्नेहा काणे यांनी त्यांना स्वरसाथ केली आहे. संत जनाबाई यांच्या पूर्वी प्रसिद्ध न झालेल्या आणि नव्याने संगीत दिलेल्या रचना त्या गाणार आहेत. संत जनाबाई यांच्या प्रासादिक रचनेला प्रतिभावान संगीतकार पं. यशवंत देव, पं. प्रभाकर जोग, पं. केदार पंडित आणि डॉ. सुनील कट्टी यांनी संगीताचा साज चढवला आहे. या मालिकेत जनाईच्या जीवनाविषयीचा संवाद पत्रकार मुकुंद कुळे यांचा असून जनाईच्या काव्याविषयीचा संवाद मीना गोखले करत आहेत. संत कवयित्री जनाबाई हिच्या जीवनाचा, काव्याचा आणि अभंग गायनाचा हा त्रिवेणी संगम या मैफिलीत झालेला आहे.