मुंबईकरांना संगीत नाटकांची मेजवानी
By admin | Published: December 12, 2015 01:32 AM2015-12-12T01:32:06+5:302015-12-12T01:32:06+5:30
नटसम्राट बालगंधर्वांच्या अभियानातून साकारलेल्या ‘स्वयंवर’ नाटकाच्या शताब्दीनिमित्त मुंबईकरांना तीन दिवसांची संगीत नाटकांची मेजवानी मिळणार आहे.
मुंबई : नटसम्राट बालगंधर्वांच्या अभियानातून साकारलेल्या ‘स्वयंवर’ नाटकाच्या शताब्दीनिमित्त मुंबईकरांना तीन दिवसांची संगीत नाटकांची मेजवानी मिळणार आहे. ११, १३ व १४ डिसेंबर रोजी वरळीच्या नेहरू सेंटर या ठिकाणी चतुर्गंध शताब्दी महोत्सवाचे आयोजन केले असून या वेळी सादर करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहेत.
महोत्सवाचे कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या महोत्सवाची माहिती दिली. ते म्हणाले की, बालगंधर्वांनी १० डिसेंबर १९१६ रोजी ग्रँट रोडच्या तत्कालीन एल्फिन्स्टन नाट्यगृहात स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला होता. त्याच्या शताब्दीनिमित्त संगीत नाटकांना पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संगीत रंगभूमीचे वैभव नव्या पिढीपुढे मांडण्याचा प्रयत्नही याद्वारे केला जाणार आहे.
शासनाने अनुदान दिल्यास चांगल्या कलाकृती निर्माण करून संगीत नाटकांना पुन्हा सोन्याचे दिवस येतील, असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाबाबत सांगताना ते म्हणाले की, शुक्रवारी ११ डिसेंबरला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या महोत्सवाचे उद्घाटन करतील.
या वेळी सायंकाळी पाच वाजता पवार यांचा अमृत महोत्सवी सत्कार, संगीत रंगभूमीवरील बुजुर्ग कलावंतांचे सत्कार आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी सहा वाजता पुण्याच्या कलाद्वयी संस्थेतर्फे स्वयंवर नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.
रविवारी १३ डिसेंबरला नाट्यसंगीताची मैफल रंगसुगंध सादर केली जाईल. तर सोमवारी १४ डिसेंबरला ‘संशयकल्लोळ’ या विनोदी नाटकाने महोत्सवाची सांगता होईल.
हे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी मोफत असून त्याच्या प्रवेशिका नेहरू सेंटरमध्ये उपलब्ध असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.