मुंबई - कोव्हिड काळातील निर्बंधांमुळे बंद असलेल्या राज्यातील एक पडदा चित्रपटगृहांसाठी आकारलेल्या परवाना शुल्कात सवलत देण्याची मागणी एक पडदा चित्रपटगृहांच्या संघटनेने केली होती. संघटनेची हि मागणी मान्य करत शासनाने एक पडदा चित्रपटगृहांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे एका अधिसूचनेद्वारे जाहिर करण्यात आले आहे.
शासनाने घेतलेल्या या निर्णयांतर्गत नियम १९६६ नुसार महाराष्ट्र राज्यातील परवाना प्राप्त एक पडदा चित्रपटगृहांना परवाना शुल्कात सवलत देण्यात आली आहे. यात २०१९ पर्यंत चित्रपट परवान्यांचे शुल्क भरून नूतनीकरण केलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना २०२० करीता पूर्ण सवलत आणि २०२१ करीता ५० टक्के सवलत मिळाली आहे. २०२० आणि २०२१मध्ये चित्रपट परवान्यांचे शुल्क भरून नूतनीकरण केलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना २०२२ करीता पूर्ण सवलत आणि २०२३ करीता ५० टक्के सवलत दिली गेली आहे. याबाबतचे आदेश संबंधित यंत्रणांना अधिसूचनेद्वारे देण्यात आले आहेत.