एसटी प्रवासात सवलती, पण परतावा का नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 10:29 AM2024-10-12T10:29:30+5:302024-10-12T10:29:47+5:30
श्रीरंग बरगे यांचा सरकारला सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसच्या प्रवास शुल्कामध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे जतींमुळे ३५० कोटी दर महिन्याला थकविले जातात. सरकारकडून त्याचा परतावासुद्धा मिळत नाही. ते एसटीला देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकार तोंडघशी पडले असल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
राज्य सरकारने एसटी प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सवलती जाहीर केल्या आहेत. ही रक्कम एसटीला देताना सरकारने कधीच पूर्णपणे दिलेली नाही. २०२३-२४ च्या अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रकमेतील ६१२ कोटी रुपये अजूनही सरकारने दिले नाहीत. याशिवाय इतरही देणी प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली रक्कम त्या-त्या संस्थांना भरण्यात आलेली नाही, असे बरगे यांचे म्हणणे आहे. हे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून, सरकारने एसटी व एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या खिळखिळे केले आहे. या खिळखिळ्या एसटीचा आवाज सरकारला येत नाही का? असा सवालही बरगे यांनी केला आहे.