मुंबई : बिहार येथे राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलाच्या दोन्ही कानांवर कॉक्लियर इम्प्लांटची शस्त्रक्रिया कूपर रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च त्यांना परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीतूनही मदत घेण्यात आली. पुढील दोन वर्षे या मुलाला इंटेसिव्ह स्पीच थेरपी देण्यात येणार असल्याची माहिती कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. समीर भार्गव यांनी दिली.बिहारमधील मंडल कुटुंबात जन्म झालेला दीपक मोठ्या आवाजालाही प्रतिसाद देत नसल्याने पालक चिंतेत होते. त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता, त्याची श्रवणक्षमता कमी असल्याचे निदान झाले. औषधोपचार करूनही काहीच फरक पडला नाही. दीपकचे आजी-आजोबा मुंबईत राहतात. त्यांनी डॉ. समीर यांची भेट घेतली. त्यानंतर दीपकला मुंबईला आणले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याच्यावर कॉक्लियर इम्प्लांटचा पर्याय असल्याचे सांगितले. श्रवण क्षमतेवर औषधोपचार करून फायदा होणार नव्हता. त्यामुळे त्याची श्रवणक्षमता वाढवण्यासाठी आणि तो बोलणे हवे असेल, तर कॉक्लियर इम्प्लांट करणे गरजेचे होते. पण त्यासाठी काही लाख रुपये खर्च येणार होता. पण मंडल कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यासाठी निधी गोळा केला. उपचारांचा खर्च काही स्वयंसेवी संस्था आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री निधीतून झाला. आता चार ते पाच दिवस दीपकला रुग्णालयात ठेवले जाणार असून, त्यानंतर काही दिवस औषधे दिली जातील. त्यानंतर स्पीच थेरपी दिली जाईल, अशी माहिती डॉ. भार्गव यांनी दिली.
चिमुरडयाच्या दोन्ही कानांवर कॉक्लियर इम्प्लांट
By admin | Published: September 23, 2016 4:02 AM