मुंबई : कोणताही नवीन गृहनिर्माण प्रकल्प करताना बिल्डर आणि ग्राहकांमध्ये वाद झाल्यास समेट घडवून आणण्यासाठी महारेराने कन्सिलिएशन फोरम स्थापन केला आहे. मात्र, वाद निर्माण झाले तर त्या फोरमकडे जाण्याची कुठलीही सक्ती बिल्डरांवर करण्यात आलेली नाही, अशी माहिती महारेराचे अध्यक्ष अजय मेहता यांनी दिली.
लोकमतने आयोजित केलेल्या रिअल इस्टेट कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते. या नव्या फोरममुळे महारेरामध्ये आणखी एक टेबल वाढला, अशी भावना काही बिल्डरांनी या परिषदेत व्यक्त केली. तेव्हा अजय मेहता म्हणाले, अशी कोणतीही सक्ती केलेली नाही. तुमचे वाद तुमच्यातच मिटले तर आम्हाला आनंदच आहे. घरातले वाद घरात मिटावेत. ते जर महारेराकडे आले तर तिथून पुढे अपिलेट प्राधिकरण, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय असा कधीही न संपणारा प्रवास होऊ शकतो. त्यामुळे आपले वाद या फोरमवर मिटले तर पुढचे सगळेच प्रश्न आपोआप संपून जातील, असेही मेहता म्हणाले. ५० टक्के वाद या फोरममुळे मिटल्याचे यावेळी ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक सुभाष रुणवाल यांनी सांगितले.
लोकमतने पुढाकार घेतल्यामुळे मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि महारेरा यांच्यात या परिषदेमुळे संवादाचा पूल तयार झाला. अनेक बांधकाम व्यावसायिक आपल्या अडचणी आणि प्रश्न मांडत होते, तेव्हा महारेराचे अध्यक्ष मेहता यांनी उपस्थितांच्या प्रत्येक प्रश्नाचे निरसन केले. महारेरा स्थापन झाल्यापासून अशा पद्धतीचा संवाद पहिल्यांदा घडल्याने बांधकाम व्यावसायिकांनी लोकमतला धन्यवादही दिले.(सविस्तर संवाद उद्याच्या अंकात)