संतपीठाच्या स्थापनेच्या मागणीने संतसाहित्य संमेलनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:05 AM2020-12-23T04:05:52+5:302020-12-23T04:05:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्य सरकारने मान्य केलेले संतपीठ लवकरात लवकर उभारण्याची मागणीने मंगळवारी नवव्या अखिल भारतीय संत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारने मान्य केलेले संतपीठ लवकरात लवकर उभारण्याची मागणीने मंगळवारी नवव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचा समारोप झाला. इंद्रायणीसह नीरा आणि भीमेचे पात्र प्रदूषणमुक्त करावे, सर्व फडकऱ्यांना मासिक वेतन मिळावे, असे ठरावही संमेलनात मंजूर करण्यात आले.
वारकरी साहित्य परिषदेच्या ९व्या मराठी संत साहित्य संमेलनाचे आज समापन झाले. पैठण किंवा पंढरपूर येथे लवकरात लवकर संतपीठ उभारण्यासाठी पाठपुरावा करण्यासह एकूण सात ठराव संमेलनात मंजूर करण्यात आले. सर्व फडकऱ्यांना मासिक वेतन मिळावे, इंद्रायणी नदीसह भीमा आणि नीरा नदीचे पात्र प्रदूषणमुक्त करावे, आळंदी येथील फडकऱ्यांच्या जमिनीवरील आरक्षण रद्द करावे, संत साहित्य संमेलनास सरकारकडून अनुदान मिळावे, असे ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले, तसेच संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी तीन ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंढरपूरचे फडप्रमुख दादामहाराज शिरवळकर यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. त्यांचे पुत्र भागवत शिरवळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष रामेश्वर शास्त्री आणि खोपोलीतील लांबे महाराज यांनाही ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाची माहिती हभप विठ्ठल पाटील यांनी दिली. संतपीठाच्या निर्मितीसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले, तर शासन दरबारी असलेले वारकरी संप्रदायांचे विषय मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांनी अमिताभ बच्चन यांच्याकडून पसायदान गाऊन घेतले आहे. त्याचे सादरीकरणही संत साहित्य संमेलनात करण्यात आल्याची माहिती विठ्ठल पाटील यांनी दिली.
समाजात होत असलेल्या नैतिकतेचा ऱ्हास थांबविण्यासाठी गावागावात संत साहित्य पोहोचायला हवे. विद्यार्थ्यांपर्यंत संताची शिकवण पोहोचविण्यासाठी विशेष जागरण मोहीम घेण्याची गरज संमेलनाचे अध्यक्ष चकोर महाराज बाविस्कर यांनी केली, तर कीर्तनाला विनोदी कार्यक्रमाचे स्वरूप देत, दर्जा घसरविणाऱ्या प्रवृत्ती आवरण घालावी, अशी मागणी फडकरी संघटनेचे माजी अध्यक्ष माधव महाराज शिवणीकर यांनी संमेलनात केली.