मुंबई – मागील तीन दिवसांत मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख घसरला आहे. मात्र त्या तुलनेत दिवसभरात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण घटलेले नाही. याविषयी राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यासाठी किमान १०-१५ दिवसांचा अवधी लागतो. त्यानंतर हे प्रमाण कमी होते, १५ मेपर्यंत मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावाची स्थिती सुधारेल. सध्या मुंबईत झालेल्या १२ हजार ९१२ कोरोना बळींमध्ये सर्वाधिक बळी सहव्याधी आणि श्वसनाच्या त्रासाने झालेले आहेत.
मुंबईत होणाऱ्या एकूण मृत्यूंत सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिक रुग्णांचे आहेत. हे प्रमाण ९० टक्के आहे. तर ७०-८० वयोगटातील मृत्यूंचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. सहव्याधी असणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. य़ाखेरीज श्वसनाच्या त्रासाने मृत्यू ओढवलेल्या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे मृत्युदरात वाढ झाली आहे, ही चिंतेची बाब आहे. ७ एप्रिल रोजी मुंबईचा मृत्युदर ०.२३ टक्के होता, यात वाढ होऊन मंगळवारी हे प्रमाण १.४७ टक्क्यांवर गेले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील मृत्यूंचे विश्लेषण करताना पूर्वीपेक्षा वेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यात येत आहे. यात मुख्यतः गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या मृत्यूंची कारणे अभ्यासली जात आहेत. या रुग्णांची प्रकृती सातव्या-आठव्या दिवशी अचानक बिघडून मृत्यू झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निकषांवर अभ्यास सुरू केला आहे. मागील लाटेच्या तुलनेत एकूण रुग्णांमध्ये तरुण पिढी बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र तुलनेने या वयोगटात मृत्यूचे प्रमाण कमी असून हे ७-८ टक्के इतके आहे, अशी माहिती कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
मुंबई
महिना मृत्यूमृत्युदर (टक्क्यांत)
जानेवारी २३६ १.४४
फेब्रुवारी १२७ ०.६९
मार्च २१५ ०.२४
एप्रिल ३३३ ०.३२
राज्य
महिना मृत्यू
जानेवारी १५६१
फेब्रुवारी १०७२
मार्च २४९५
एप्रिल ३०५९
वयोगटानुसार मृत्यूंची आकडेवारी
वयोगटरुग्ण रुग्ण मृत्युदर (टक्क्यांत)
०-९ १७ ०.२
१०-१९ ३३ ०.१५
२०-२९ १२७ ०.१६
३०-३९ ३७२ ०.४
४०-४९ १०८५ १.२
५०-५९ २५७२ १.२
६०-६९ ३४३५ ५.२
७०-७९ २८६४ ८.३
८०-८९ १३७२ ११.६
९०च्या वर १८८ ११