सौंदर्यीकरणाला विरोध नाही; पण गर्दीचे काहीतरी करा, रेल्वे प्रवाशांनी मांडली कैफियत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 10:17 AM2024-05-09T10:17:33+5:302024-05-09T10:19:32+5:30
मुंबई महानगर प्रदेशात येणारे लोंढे थांबणार नाहीत. परिणामी वाढत्या लोकसंख्येसाठी वाढीव फेऱ्यांचाही विचार केला पाहिजे, असे रेल्वे प्रवाशांनी सांगितले.
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेने स्थानकांच्या सौंदर्याकरणावर वारेमाप खर्च केला आहे. स्थानके सुंदर, स्वच्छ केली जात आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी स्वच्छता आवश्यक आहेच; त्याला विरोध नाही.
मात्र, हे सगळे करताना रेल्वे प्रवास करताना रेल्वे प्रवाशांचे होणारे अपघात रोखण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. कारण मुंबई महानगर प्रदेशात येणारे लोंढे थांबणार नाहीत. परिणामी वाढत्या लोकसंख्येसाठी वाढीव फेऱ्यांचाही विचार केला पाहिजे, असे रेल्वे प्रवाशांनी सांगितले.
लोकल आमच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. आमच्या रोजीरोटीसाठी कामाच्या ठिकाणी जाण्याकरिता लोकलचा मोठा फायदा होत आहे. मात्र, गर्दी काही केल्या कमी होत नाही. दुसरीकडे राज्यातून येणारे लोंढे थांबत नाहीत. त्यामुळे सामान्य मुंबईकर मात्र जीव मुठीत घेऊन प्रवास करतो.- संतोष जाधव
गर्दुल्ल्यांचा वावर थांबविणे आवश्यक आहे. सर्व लोकल फेऱ्या वातानुकूलित करण्यासाठी वापरल्यास प्रवाशांच्या हिताचे असेल. लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या चाकरमानीवर्गाला भरपाई मिळण्यापेक्षा धोरण ठरवावे. स्थानकालगत असलेले स्कायवॉक बेकायदेशीर रहिवासासाठी सर्रास वापरले जात असून, त्याचे विद्रुपीकरण होत आहे. - विष्णू देशमुख
रेल्वेवरील वाढता ताण पाहता प्रवासी संख्या कमालीची वाढली आहे. त्यामानाने सुविधा 'जैसे थे आहेत. एसी लोकलची संख्या वाढवावी, तसेच त्याचा दर सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात असावा. प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या प्राथमिक सुविधा मोफत असाव्यात.
- निशांत घाडगे
तिकीट परवडणारे असल्याने गरीब मजूर लोकलने प्रवास करतात; परंतु गर्दीमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन रोजच्या रोज प्रवास करावा लागत असेल तर त्याला आळा बसायला हवा. एसी लोकलचे दर कमी करण्यात यावेत. जेणेकरून ते मध्यमवर्गीयांना परवडतील. अन्यथा एसी लोकलमुळे स्टेशनवर गर्दी होईल व अपघातांचे प्रमाण वाढेल.- नंदू शिंदे
८० टक्के लोक लोकलने प्रवास करतात. प्रत्येकाला एसीचे तिकीट परवडेल, असे नाही. त्यामुळे एसीचे तिकीट कमी केले पाहिजे. साध्या लोकलच्या फेऱ्या वाढविल्या पाहिजेत. पश्चिम रेल्वेवर ज्या स्थानकांवर गर्दी होते; तेथून अतिरिक्त लोकल सोडल्या पाहिजेत.
- जगन्नाथ गायकवाड