मुंबई - नाल्यांमध्ये रूपांतरित झालेल्या नद्यांचे पुनरुज्जीवन प्रकल्प महापालिकेने हाती घेतलत आहे. नदी, नाल्यांमध्ये काँक्रिटीकरण केले जात आहे. अनेक ठिकाणी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीकाठाकडील भागातूनही जमिनीत पाणी झिरपणे थांबले आहे. यावर उपाय म्हणून आवश्यक तेथेच नद्यांमध्ये काँक्रिटीकरण केले जावे, तसेच उर्वरित भागात दगडमातीच्या पर्यावरणपूरक भिंती बांधण्यात याव्यात, अशा सूचना महापालिका महासभेत करण्यात आल्या आहेत.
मागील काही वर्षांमध्ये मुंबईत काँक्रीटचे जंगल तयार झाले आहे. या काँक्रिटीकरणामुळे भूजलस्तर कमी होत चालला आहे. नदी, नाल्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. नद्यांच्या संरक्षण भिंती, नदीतळाकडील काँक्रिटीकरण यामुळे जैवविविधता संपुष्टात येऊन नदी आणि मातीचा संपर्कही तुटत आहे. नदीपात्रातील प्राणी, परिसरातील पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वावर गदा येत आहे. नदीकाठच्या परिसरातूनही जमिनीत पाणी झिरपत असते. ही प्रक्रियादेखील काँक्रिटीकरणामुळे थांबली असून, भूजलस्तर खालावला आहे. त्यामुळे मुंबईतील नद्यांचे अस्तित्व टिकवणे व जैवविविधता जपण्यासाठी नद्यांमध्ये अनिवार्य असलेल्या भागातच काँक्रीटच्या भिंती बांधल्या जाव्यात अशा ठरावाची सूचना नगरसेविका रुकसाना सिद्दिकी यांनी पालिका महासभेपुढे मांडली आहे.भूजलस्तर वाढविण्यासाठी पाझर खड्डेमुंबईतील भूजल पातळी वाढविण्यासाठी महापालिकेने आपल्या ७० उद्यानांमध्ये पावसाचे पाणी मुरवण्यासाठी पाझर खड्डे खणले आहेत, तर आणखी काही दिवसांमध्ये अडीचशे उद्यानांमध्ये असे पाझर खड्डे खणले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत जिरवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे झाडांची मुळे मजबूत होतील. तसेच कूपनलिका पुनर्जीवित होतील. खार येथील राजेश खन्ना उद्यान, सांताक्रूझ पश्चिम येथील मुक्तानंद पार्क, कांदिवली पूर्व येथील दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे असे पाझर खड्डे खणण्यात आले आहेत. दरम्यान, पर्जन्य जलवाहिन्यांच्या प्रत्येकी शंभर फूट अंतरावर पाझर खड्डे खणावेत, अशी ठरावाची सूचना नगरसेविका अलका केरकर यांनी पालिका महासभेपुढे मांडली आहे.