मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काँक्रीटीकरण एप्रिलअखेर; एनएचएआयची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 10:25 AM2024-07-06T10:25:27+5:302024-07-06T10:25:53+5:30
महामार्गावर सध्या पाच ते सहा ठिकाणी एकाचवेळी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या राज्यातील १२१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पुढील वर्षील एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) ठाणे विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी दिली.
मुंबई-अहमदाबाद महार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम एनएचएआयकडून हाती घेतले आहे. निर्मल बिल्ड इन्फ्रा या कंपनीकडून हे काम सुरू असून ते १८ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे. सध्या या महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे जवळपास ३७ टक्के कामे पूर्ण झाले आहे.
महामार्गावर सध्या पाच ते सहा ठिकाणी एकाचवेळी काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक वाहनांसाठी तीन अंडरपास आणि १० ठिकाणी फूटओव्हर ब्रीजचे काम हाती घेतले आहे. याचे ४० टक्के कामे पूर्ण झाले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कामे एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.
एनएचआयएला हवी आहे मदत
काँक्रिटीकरणाचे काम जलद पूर्ण करण्यासाठी महामार्गावर काही तासांचा अथवा दिवसांचा ब्लॉक घेता यावा यासाठी एनएचएआयने विनंती केली आहे. उत्तर भारतातून येणारी ७० ते ७५ टक्के वाहने जेएनपीटी आणि भिवंडी दिशेकडे जातात. त्यामुळे मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पालिका हद्दीतील महामार्गावर कोंडी टाळण्यासाठी उत्तर भारतातून येणाऱ्या अवजड वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एनएचएआयने केली आहे. चिंचोटी ते भिवंडी, शिरसाड ते परोळ-भिवंडी आणि मनोर ते वाडा-भिवंडी या मार्गावरून वाहतूक वळवावी, अशीही मागणी एनएचएआयने केली आहे. ट्रक टर्मिनस उभारावे, ट्रॅफिक वॉर्डनला पोलिस ऑन स्पेशल ड्यूटीचे लोगो द्यावेत, अशीही विनंतीही केल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.