Join us

वाहतूककोंडी टाळण्यासाठी रस्त्यांचे काँक्रिटीकरण रात्रीच करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:06 AM

पालिकेने हाती घेतलेल्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पासाठी आयआयटीच्या सहकार्याने पालिकेच्या अभियंत्यांसोबत विचारमंथन करणारी कार्यशाळा आयोजित केली होती.

मुंबई :

सिमेंट काँक्रीट आणि खडी वाहून आणणारी वाहने, रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटमधील अंतर, शहरातील वाहतूक कोंडी यांसारख्या अडचणी लक्षात घेता रस्ते काँक्रिटीकरणाची कामे शक्यतो रात्रीच्या वेळेस करा, असा सल्ला आयआयटीच्या तज्ज्ञांनी मुंबई पालिकेच्या अभियंत्यांना दिला आहे.

पालिकेने हाती घेतलेल्या रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पासाठी आयआयटीच्या सहकार्याने पालिकेच्या अभियंत्यांसोबत विचारमंथन करणारी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आयआयटी मुंबईचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. के. व्ही. कृष्णराव, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते आणि वाहतूक)  मनीषकुमार पटेल तसेच संबंधित अधिकारी व रस्त्याच्या कामांसाठी नियुक्त केलेले अभियंते यावेळी उपस्थित होते. १५० हून अधिक अभियंते तसेच सल्लागार कंपन्यांच्या अभियंत्यांचा  कार्यशाळेमध्ये सहभाग होता. यावेळी काँक्रीट रस्त्याला पडणाऱ्या भेगांची कारणे व उपाययोजना, यावर आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. सोलोमॉन देबर्ना यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. के. व्ही. राव यांनी रस्त्यावरील भेगांची दुरुस्ती व देखभालीसाठी पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करण्याची सूचना केली.

२० वर्षे टिकणारे रस्ते रस्ते दर्जेदार असावेत म्हणून आयआयटी आणि अभियंत्यांसोबत विचारमंथन करून केले जाणारे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे, असे आयुक्त म्हणाले. रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्यानंतर त्याचे आयुर्मान किमान २० पेक्षा अधिक वर्षे टिकून रहावे, अशा दृष्टीने नियोजन करावे, असे मत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी व्यक्त केले.

अभियंत्यांनी दिली आव्हानांची माहिती काँक्रीट आणि खडी वाहून आणणारी वाहने, रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटमधील अंतर, हवामान, वाहतूक कोंडीमुळे सिमेंट-खडी मिश्रणात पाण्याचे घटणारे प्रमाण आदी आव्हाने असल्याची माहिती अभियंत्यांनी दिली. दमट वातावरण, वाहतूक कोंडी यासारखी आव्हाने पाहता काँक्रिटीकरणाची कामे ही रात्रीच्या वेळेत करण्याचे आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी सुचवले.

टॅग्स :मुंबई