मुंबईतील ४४ फुटांहून रुंद रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 02:00 AM2020-03-01T02:00:15+5:302020-03-01T02:00:20+5:30
दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यात जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे.
मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यात जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यानुसार ४४ फुटांपेक्षा जास्त रुंदीच्या सर्व रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच छोट्या रस्त्यांवर अल्ट्रा थीन व्हाइट टॉपिंग म्हणजे कमी जाडीचा काँक्रिटचा थर चढविला जाणार आहे.
दरवर्षी मुंबईतील रस्त्यांची डागडुजी केली जाते. मात्र प्रत्येक पावसाळ्यात रस्ते खड्ड्यात जातात. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी महापालिकेने ४४ फुटांपेक्षा रुंद रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित केले. त्यानुसार २८९ कि.मी. रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. तर २६६ कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. मात्र जमिनीखाली उपयोगिता सेवा कंपन्यांंच्या केबलचे जाळे आहे. या जाळ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येणार आहे. काँक्रीटचे रस्ते दहा वर्षे टिकतात, त्यामळे मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटीकरण बेस्ट उपाय ठरणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.