मुंबई - भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर वादाला तोंड फुटले आहे. या निवडणुकीत खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांचा विजय झाला. त्यानंतर, काही कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली असून कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला कायमचा रामराम ठोकला. तर ऑलिंपिक विजेता बजरंग पुनियाने आपला पद्म पुरस्कार परत केला आहे. त्यावरून, आता चांगलंच राजकारण होताना दिसून येत आहे. बजरंग पुनिया यांच्या कृत्याचं समर्थन करत अनेकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, भाजपा समर्थकांनी पुनियाच्या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.
बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या कृत्यावर प्रतिक्रिया देताना, "काँग्रेसच्या मांडीवर बसलेल्या या कुस्तीपटूंसोबत देशातील एकही कुस्तीपटू नाही. ते विरोध करत आहेत, त्यांच्या विरोधामुळे मी आता फाशी घेऊ का?, अशी उद्विग्न प्रतिक्रिया माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी दिली. तर, बजरंग पुनियाने पद्म पुरस्कार रस्त्यावर ठेवल्यामुळे भाजपा नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपा नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बजरंग पुनियाने केलेलं कृत्य निंदनीय व निषेधार्ह असल्याचे सांगत, हा देशातील जनतेचा अपमान आहे, असे म्हटले. मुनगंटीवार यांनी ट्विट करुन पुनिया यांच्या कृत्याबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे.
पुनियाने 'पद्मश्री' रस्त्यावर ठेवला
कुस्तीपटू बजरंग पुनिया याने शुक्रवारी पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला असून, त्याने पंतप्रधानांना पत्र लिहिले. त्याने हे पत्र व पदक प्रत्यक्ष भेटून पंतप्रधानांना सुपुर्द करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी अडविल्यामुळे त्याला तसे करता आले नाही. यावेळी त्याने आपले पद्मश्री पदक रस्त्यावर ठेवले होते. शेवटी त्याने सोशल मीडियावर हे पत्र पोस्ट केले. पुनियाला २०१९ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी शुक्रवारी साक्षी मलिक यांच्या निवासस्थानी गेल्या. तेथे त्यांनी साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्याशी चर्चा केली. या लढाईत कुस्तीपटूंना साथ देण्याचा शब्द त्यांनी दिला.
बजरंग पुनियाने पत्रात काय लिहिले
आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावे का? पत्रात केला सवालब्रिजभूषण यांच्याविरोधातील पहिले आंदोलन सरकारच्या कारवाईच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले होते. तीन महिने उलटूनही एफआयआर दाखल न झाल्याने पुन्हा आंदोलन करावे लागले. आंदोलन ४० दिवस चालले. आमचे आंदोलनाचे स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले होते. तेव्हा आमची पदके गंगार्पण करण्याचा विचार केला होता; पण आम्हाला प्रशिक्षक व शेतकऱ्यांनी तसे करू दिले नाही. त्याचवेळी तुमच्या एका मंत्र्याचा फोन आला. त्यांनी आम्हाला परत येण्यास सांगितले.आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन थांबवले. २१ डिसेंबर रोजी ब्रिजभूषण पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्यांनी ‘आपले वर्चस्व आहे आणि कायमच राहील’ असे विधान केले. ‘आम्ही सर्वांनी रडत रात्र काढली. कुठे जावे, काय करावे समजत नव्हते. सरकार व लोकांनी खूप आदर दिला. या आदराच्या ओझ्याखाली गुदमरत राहावं का?’ अशी भावना पुनियाने या पत्रात व्यक्त केली.
काय आहे प्रकरण
कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांचे मित्र कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाल्यामुळे न्याय मिळण्याच्या आशा आणखी कमी झाल्या आहेत, असे संजय सिंह यांच्या विजयानंतर या कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. त्यामुळे कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी केली होती. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता.