Join us  

शताब्दी रुग्णालयाचा लढा चिघळण्याच्या स्थितीत

By admin | Published: April 11, 2017 3:20 AM

गेले १२ दिवस सुरू असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी कामगारांच्या आंदोलनाने आज तीव्र स्वरूप धारण केले आहे.

मुंबई : गेले १२ दिवस सुरू असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी कामगारांच्या आंदोलनाने आज तीव्र स्वरूप धारण केले आहे. ११ दिवस काम करून बैठा सत्याग्रह करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी ६ एप्रिल रोजी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन त्यात कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करू तसे आदेश संबंधितांना दिले होते. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आज १२ व्या दिवशीही कामगारांना त्यांचे वेतन आणि थकबाकी देण्यात कसूर केल्याने कामगारांचे आंदोलन चिघळण्याच्या स्थितीत आहे. या २४0 कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी येथील कायम कामगार आणि स्टाफ अधिसेविका परिसेविका यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.मुंबई महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्या २४0 कामगारांना गेले सहा महिने वेतन नाही. महत्त्वाचे म्हणजे या कामगारांना किमान वेतन, विशेष भत्ता, विमा असे कामगार कायदा आणि किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन आणि लाभ दिले जात नाहीत. याबाबत या कामगारांनी १२ दिवसांपूर्वी बैठा सत्याग्रह केला होता. यात कामगार आपली ड्युटी करून सुट्टीच्या वेळेत वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनाबाहेर शांततेने बैठा सत्याग्रह करत होते. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांना बैठकीसाठी आमंत्रित केले. ६ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत या सर्व मागण्या मान्य करून कामगारांना थकबाकीसह किमान वेतन देण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे बैठकीत सांगितले. या बैठकीला सहा दिवस उलटल्यानंतरही या कामगारांच्या वेतनाबाबत आवश्यक ती प्रक्रिया रुग्णालय प्रशासनाने पूर्ण केली नसल्याने कामगारांवर उपासमार आली असल्याने सोमवारी संघटनेने संतप्त होऊन काम बंद आंदोलन पुकारले आहे. इतके दिवस रुग्ण सेवेवर काहीही परिणाम होऊ नये म्हणून कामगारांनी वेतन मिळत नसताना काम केले. आता मात्र सहनशीलता संपल्याचे सांगत कामगारांनी बंद जाहीर केला. कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी हॉस्पिटलमधील कायम कामगार आणि अधिसेविका तसेच परिसेविका यांनीदेखील या लढ्याला पाठिंबा देऊन आंदोलनात सामील होणार असल्याचे सांगितले. एनजीओकरण करून ठेकेदारांकरवी कामगारांची चालवलेली पिळवणूक रुग्णालय प्रशासनाच्या सहभागाने सुरू असल्याचा आरोप करत आंदोलन आता अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा या वेळी विवेक पंडित यांनी दिला. विवेक पंडित यांच्या आई रजनी पंडित यादेखील गेले १२ दिवस सतत आंदोलनात सहभागी आहेत. (प्रतिनिधी)