व्हेंटिलेटरवर जाण्याआधी उपाययोजना करा; अरविंद सावंत यांचे पंतप्रधानांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमटीएनल आणि बीएसएनएलची अवस्था सध्या ऑक्सिजन लावलेल्या रुग्णासारखी झाली आहे. या संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी वेळेत उपाययोजना न केल्यास त्या व्हेंटिलेटरवर जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रश्नावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असून, दूरसंचार मंत्रालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एमटीएनल, बीएसएनएलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना आणण्यात आली. परंतु, मोठ्या प्रमाणात कामगार निवृत्त झाल्यानंतर या कंपन्यांचे कामकाज कसे चालवायचे, याचे नियोजन केले नाही. मुंबईत एमटीएनलच्या अखत्यारीत सध्या केवळ ९०० कायमस्वरूपी कामगार आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्र, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, पनवेल, उरणमधील सेवा इतक्या कमी मनुष्यबळाच्या आधारावर कशी काय सुरळीत राहील, असा सवाल त्यांनी पत्रात उपस्थित केला.
अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी एमटीएनल आणि बीएसएनएलने कंत्राटदार कंपन्यांची नियुक्ती केली आहे. परंतु, या कंत्राटदारांनी अकुशल कामगारांची भरती केल्याने ताण कमी होण्याऐवजी उपद्व्याप वाढला आहे. या कंत्राटी कामगारांना दूरसंचार क्षेत्राचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे ग्राहकांच्या समस्यांचे समाधान करण्यात ते अपयशी ठरत आहेत, ही बाबही त्यांनी पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिली आहे.
कुशल आणि पुरेसे मनुष्यबळ, तसेच सरकारच्या आर्थिक पाठबळाशिवाय एमटीएनल आणि बीएसएनएल खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू शकणार नाहीत. त्यामुळे या कंपन्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सावंत यांनी पत्राद्वारे केली आहे.
* वर्षभरात एकही नवा ग्राहक नाही!
- गेल्या वर्षभरात या दोन्ही कंपन्यांनी एकतरी नवा ग्राहक जोडला आहे का, हे तपासा. ज्या कंत्राटदारांची नियुक्ती केली, ते काळ्या यादीतील आहेत. ‘समाधानकारक सेवा’ असे शिक्कामोर्तब करून कंत्राटदारांची देयके काढली जातात.
- ग्राहक सुविधा, दुरुस्ती, सेवा विस्तार अशा सर्वच निकषांवर या कंपन्या अपयशी ठरत आहेत. एमटीएनलकडे तर आता लॅण्डलाईन हीच सेवा उरली आहे. मात्र सुविधेतील ढिलाईमुळे हजारो ग्राहक सोडचिठ्ठी देत आहेत.
- मुंबईत एमटीएनलकडे अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असे डेटा सेंटर उपलब्ध आहे. आयआयटीच्या तज्ज्ञांनी त्याची उभारणी केलेली आहे. परंतु, त्याचा वापर अपेक्षित प्रमाणात केला जात नाही. या आणि अशा अनेक बाबी सावंत यांनी पत्रात नमूद केल्या आहेत.
....................................