जलजोडणीसाठी मालकाच्या परवानगीची अट वगळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 11:32 PM2018-10-26T23:32:49+5:302018-10-26T23:33:01+5:30

महापालिकेकडून घरात स्वतंत्र जलजोडणी घेण्यासाठी चाळ मालक व पागडी पद्धतीमध्ये घरमालकाची परवानगी घ्यावी लागते.

The condition of the owner's permission for water connection will be excluded | जलजोडणीसाठी मालकाच्या परवानगीची अट वगळणार

जलजोडणीसाठी मालकाच्या परवानगीची अट वगळणार

Next

मुंबई : महापालिकेकडून घरात स्वतंत्र जलजोडणी घेण्यासाठी चाळ मालक व पागडी पद्धतीमध्ये घरमालकाची परवानगी घ्यावी लागते. मात्र या अटीचा फायदा उठवत घरमालक भाडेकरूंना लुटतात. पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार असल्याने घरमालकाच्या ना हरकत प्रमाणपत्राची अट वगळण्यात यावी, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेपुढे करण्यात आली आहे. ही अट शिथिल केल्यास मुंबईतील लाखो भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे.
पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार असताना अनेकांना त्यासाठी वणवण करावी लागते. या वर्षी अपुऱ्या पावसामुळे मुंबईत पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात अनेक झोपडपट्टी विभागात अधिकृत जलजोडण्या न मिळाल्यास जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी केली जाते. यामुळे दररोज २० ते २५ टक्के म्हणजेच हजारो लीटर्स पाणी वाया जाते. परिणामी करदात्यांची घागर रिकामी असते.
मुंबईत विशेषत: शहर भागात आजही काही जुन्या चाळी असून पागडी पद्धतीने घरांची खरेदी व विक्री होते. या घरांमध्ये मालक त्यांच्या भाडेकरूंना स्वतंत्र निवासी जलजोडणी घेण्यास परवानगी देत नाही, असे पाहण्यास मिळते. त्यामुळे स्वतंत्र जलजोडणीसाठी चाळ अथवा घरमालकाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. यामुळे भाडेकरूंची गैरसोयच होत असल्याने ही अट वगळण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका रिटा मकवाना यांनी पालिका महासभेत ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अतिरिक्त नळ जोडण्या केल्यानंतर मुंबईला मुबलक पाणी मिळेल का प्रश्न आहे़
>...तरच मिळेल भाडेकरूंना दिलासा
पाणी मिळणे हा भाडेकरूंचा अधिकार आहे, मात्र काही वेळा घरमालक पैशांसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास अडवणूक करतात. त्यामुळे ही अटच महापालिकेने वगळल्यास भाडेकरूंना दिलासा मिळू शकेल.
>आयुक्तांच्या अभिप्रायाकडे लक्ष
ही ठरावाची सूचना महापालिकेच्या येत्या महासभेत मंजुरीसाठी मांडण्यात आली आहे. महासभेच्या मंजुरीनंतर आयुक्तांचा अभिप्राय यावर घेण्यात येईल, त्यांनी हिरवा कंदील दाखविल्यास यावर तत्काळ अंमल होऊ शकेल.
>घरमालकांकडून भाडेकरूंची लूट
चाळी व पागडी पद्धतीच्या घरात घरमालकाच्या ना हरकत प्रमाणपत्रानंतरच स्वतंत्र जलजोडणी भाडेकरूंना मिळते. मात्र या अटीचा फायदा उठवत चाळमालक अथवा घरमालक ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी भाडेकरूंकडून भरमसाट रकमेची मागणी करतात.
परंतु पालिकेकडून जलजोडणी घेण्यासाठी शुल्क भरल्यानंतर चाळ, घरमालकाच्या ना हरकत प्रमाणपत्राकरिता परत पैसे देणे भाडेकरूंसाठी
त्रासदायक ठरते.

Web Title: The condition of the owner's permission for water connection will be excluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी