Join us  

तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

By admin | Published: February 24, 2016 3:23 AM

‘एक्सरे, एमआरआय, सीटी स्कॅन केला जाईल, पण रिपोर्ट लगेच मिळणार नाहीत. रिपोर्टसाठी थांबावे लागेल’ हा संवाद नायर रुग्णालयात रुग्णांना नित्याचा झाला आहे. एक्सरे, एमआरआय

मुंबई : ‘एक्सरे, एमआरआय, सीटी स्कॅन केला जाईल, पण रिपोर्ट लगेच मिळणार नाहीत. रिपोर्टसाठी थांबावे लागेल’ हा संवाद नायर रुग्णालयात रुग्णांना नित्याचा झाला आहे. एक्सरे, एमआरआय आणि सीटी स्कॅन करणाऱ्यासाठी फक्त ८ तंत्रज्ञ असल्याने रुग्णांना रिपोर्टसाठी ताटकळत राहावे लागत आहे. नायर रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. दिवसभरात ५०० ते ६०० रुग्णांचे एक्सरे, सीटी स्कॅन आणि एमआरआय काढले जातात. पण या विभागात फक्त आठ तंत्रज्ञ आहेत. गेल्या काही दिवसांपासून नायर रुग्णालयात एक्सरे आणि सीटी स्कॅनचे पहिल्या आणि दुसऱ्या पाळीतच काम सुरू आहे. रात्रपाळीला पुरेसे तंत्रज्ञ नसल्यामुळे रात्रपाळीचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना त्रास होत आहे. १ मार्चपर्यंत तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आले नाहीत, दुसऱ्या पाळीतले कामही बंद करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. नायर रुग्णालयातील कामाचा भार पाहता, विभागात २० तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. पण सध्या तेथे फक्त ६ तंत्रज्ञ काम करतात. दोन तंत्रज्ञ रजेवर आहेत आणि पुढच्या काही महिन्यांत तीन तंत्रज्ञ निवृत्त होणार आहेत. परिणामी, रुग्णांनादेखील याचा फटका बसत आहे. शक्य तितक्या रुग्णांचे रिपोर्ट देण्याचे प्रयत्न करण्यात येत असले तरीही सर्वांचेच रिपोर्ट देणे अशक्य होते. कारण, रिपोर्टची प्रिंट काढण्यासाठी माणसेच नाहीत. १६ जुलै २०१५ला पालिकेसाठी ३५ तंत्रज्ञांची निवड केली होती. ११ तंत्रज्ञ हे नायर रुग्णालयासाठी दिले आहेत. पण त्यांची भरती झालेली नाही, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)तंत्रज्ञांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. भरतीआधी त्यांची एक परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतरच त्यांना रुजू करून घेण्यात येईल.- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय