Join us  

धर्मराज काळोखेला सशर्त जामीन

By admin | Published: August 08, 2015 1:55 AM

: बहुचर्चित बेबी पाटणकर प्रकरणातील प्रमुख आरोपी धर्मराज काळोखे याला आज विशेष सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मात्र सातारा येथील गुन्ह्यात

मुंबई : बहुचर्चित बेबी पाटणकर प्रकरणातील प्रमुख आरोपी धर्मराज काळोखे याला आज विशेष सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. मात्र सातारा येथील गुन्ह्यात जामीन अर्ज प्रलंबित असल्याने काळोखेला कारागृहातच राहावे लागेल. मात्र काळोखेला मिळालेला जामीन हा मुंबई गुन्हे शाखेला या प्रकरणात बसलेला आणखीन एक मोठा धक्का मानला जात आहे. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून नेमणुकीस असलेल्या काळोखेला प्रथम सातारा पोलिसांनी अटक केली. त्याच्या पुण्यातील घरातून सातारा पोलिसांनी तब्बल ११० किलो पांढरी भुकटी हस्तगत केली. ही भुकटी एमडी हा अत्यंत घातक अमलीपदार्थ असल्याचा समज करून घेत पोलिसांनी ही कारवाई केली. चौकशीत काळोखेने ड्रगमाफिया बेबी पाटणकरचे नाव घेतले होते. सातारा पोलिसांच्या या कारवाईनंतर मरिन ड्राइव्ह पोलिसांनी पोलीस ठाण्यातील काळोखेचा लॉकर तपासला. त्यातही १२ किलो पांढरी भुकटी सापडली. तेव्हा मरिन ड्राइव्ह पोलिसांनी काळोखेविरोधात एमडीचा आणखी एक गुन्हा नोंदवला. पुढे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. काळोखेच्या कपाटातून एक मतदार ओळखपत्र सापडले होते. त्यावर फोटो काळोखेचा तर नाव बेबी पाटणकरचा पती रमेशचे होते. ज्या दिवशी काळोखेने जामीन अर्ज केला त्या दिवशी गुन्हे शाखेने हे ओळखपत्र रेकॉर्डवर आणले. यावरून काळोखेला या प्रकरणात गुंतविण्याचा गुन्हे शाखेचा हेतू स्पष्ट होतो; तसेच मुंबईतील गुन्ह्यात अटक झाली तेव्हा काळोखेच्या ताब्यातून एमडी सापडलेले नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड. वाणी यांनी केला. तो ग्राह्य मानून विशेष न्यायालयाने शुक्रवारी काळोखेला ५ लाखांचा जामीन मंजूर केला. दर सोमवारी हजेरी देणे, मुंबई सोडण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेणे या अटीही घातल्या.