मुंबई : देशभरातील दहा संस्थांना ड्रोनचा वापर करण्यास नागरी वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण संचालनालयाने सशर्त परवानगी दिली आहे. यात राज्यातील चार संस्थांचा समावेश आहे.
या संस्थांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई, महिंद्रा अँड महिंद्रा मुंबई, बेयर क्रॉप सायन्स मुंबई, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे यांचा समावेश आहे. उपरोक्त आस्थापनांसह देशभरातील १० संस्थांना मानवरहित विमान प्रणाली (यूएस) नियम २०२१ मधून सशर्त सूट देण्यात येत असल्याचे या दोन्ही विभागांनी संयुक्तरीत्या जाहीर केलेल्या आदेशात नमूद केले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान या संस्थेस पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या आदिवासी भागात आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर ‘बीव्हीएलओएस’ ड्रोन उडविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यात अनुक्रमे भात आणि गरम मिरची पिकावर ड्रोन आधारित कृषी चाचण्या आणि अचूक फवारणी करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ड्रोनचा वापर करू शकेल. ड्रोन आधारित कृषी संशोधनासाठी बेयर क्रॉप सायन्स या संस्थेस परवानगी देण्यात आली आहे. आयआयटीएम भोपाळ, एनडीए पुणे, कराड विमानतळ, उस्मानाबाद विमानतळ, मोहम्मद एअरफील्ड फारुखाबाद या पाच ठिकाणी वातावरणीय बदलांतील संशोधनासाठी ड्रोन उड्डाणाची परवानगी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेला देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे कर्नाटक सरकार, गंगटोक स्मार्ट सिटी प्रकल्प, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया प. बंगाल, एशिया पॅसिफिक फ्लाइट ट्रेनिंग अकादमी हैदराबाद, ब्लू रे एव्हिएशन गुजरात, ट्रॅक्टर आणि फार्म इक्विपमेंट लिमिटेड चेन्नई यांनाही ड्रोन संचलन करता येणार आहे.