Join us  

जेट्टी विस्ताराला स्थानिकांचा सशर्त पाठिंबा

By admin | Published: May 23, 2014 3:56 AM

स्थानिकांमध्ये आम्हाला विकास हवा आहे, यासाठी आमचा पाठिंबा तर ६ किमी परीघ क्षेत्राबाहेरच्या कंपनीच्या प्रदूषणावर बोट ठेवीत विरोध दर्शवित होते

पेण : पेणच्या डोलवीस्थित जेएसडब्लू स्टील कंपनीच्या मालकीच्या धरमतर बंदरावर कार्यरत असलेल्या जेएसडब्लू पोर्ट कंपनीची ३३१.५ मीटर लांबीच्या जेटीचा विस्तार ७१८.५ मीटर लांब करण्याचा ७५० कोटी खर्चाचा प्रकल्प साकारत असून याबाबत या परिसरातील संबंधित ग्रामपंचायतीने मच्छीमार सोसायट्यांचे चेअरमन, शेतकरी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या जनसुनावणीचा कार्यक्रम महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे होते. जनसुनावणीच्या जय किसान मंदिर वडखळ येथील प्रांगणात नागरिकांची जमलेलेली मोठी गर्दी, कंपनीच्या प्रकल्पाचे संभावित धोक्याबाबत प्रभावी उपाययोजना, त्यावरचे आक्षेप, सुधारणा करण्यावर भर द्या एकंदर विकासाला विरोध न दर्शविता जनसुनावणीत प्रकल्पाला पाठिंबा मिळाला. जनसुनावणीसाठी प्रदूषण मंडळाचे अधिकारी दिलीप खेडकर, पेणचे प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर, जेएसडब्लू कं पनीचे अरुण शिर्के, कंपनी प्रशासनाचे ओम पवार, कुमार थत्ते, एस. एम. पाटील, जेएसडब्लू पोर्टचे अधिकारी पात्रा, रा.जि.प. सदस्य संजय जांभळे, पर्यावरण संवर्धन संस्था, साकवचे अरुण शिवकर, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व स्थानिक प्रकल्पबाधितांचा सहभाग होता. जेएसडब्लू स्टील कंपनीने लोह उत्पादनात प्रतिवर्ष ३.२ दश लक्ष टनावरून १० दशलक्ष टन उत्पादन करण्यासाठी प्रस्तावित प्रकल्प वाढविणे, येत्या पंधरा महिन्यात ४.७ दशलक्ष टन इतकी उत्पादन क्षमता वाढविण्यात येणार असून, त्यासाठी लागणारा कच्चा माल ८.२४ दशलक्ष टनावरून २८.६० दशलक्ष टन जेटीवर आणण्यात येणार आहे. त्यामुळे धरमतर बंदरावर सध्या कार्यरत असलेल्या ३३१.५ मीटर लांबीच्या जेटीचा विस्तार या येणार्‍या प्रचंड कच्च्या मालासाठी करण्यात येणार आहे. जेटीचा थेट धरमतर बंदर ते बेणेघाट असा एकूण १७५० मीटर लांबी असलेल्या एरिया या कार्यकक्षेत येणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी धरमतर खाडीतील २५० मीटर लांबीचा चॅनेल, त्याची खोली वाढविण्यात येईल व सध्या २८०० टन ते ३२ टनाचे बार्जेस येतात ते पुढे १० हजार टनाचे येतील. यासाठी ८४ हेक्टर जागेचे भूसंपादन होणार असून मालाच्या साठवणुकीसाठी ५३ हेक्टर जागेची आवश्यकता भासणार आहे. १०५० डीडब्लूटी क्षमतेची मोठी जहाजे मदर व्हेसेल्स धरमतर खाडीत अवतरणार असून ७५० कोटी खर्चाची धरमतर जेट्टी विस्तार तथा रुंदीकरणाच्या प्रकल्प प्रोसेसमध्ये येथील जनजीवन, पर्यावरण, शेती, सागरी संसाधने, हवा, पाणी आणि समुद्रावर जगणारे मच्छीमार, जैविक संपदा या सार्‍या घटकांवर काय परिणाम जाणवणार याबाबत घेतलेल्या जनसुनावणीला मोठ्या गर्दीचे स्वरूप आले होते. स्थानिकांमध्ये आम्हाला विकास हवा आहे, यासाठी आमचा पाठिंबा तर ६ किमी परीघ क्षेत्राबाहेरच्या कंपनीच्या प्रदूषणावर बोट ठेवीत विरोध दर्शवित होते. (वार्ताहर)