अटी, निर्बंध लादा; पण व्यवसाय करू द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:07 AM2021-04-09T04:07:46+5:302021-04-09T04:07:46+5:30
मुंबई काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्यापारी आणि दुकानदार शासनाचे सर्व नियम, अटी आणि निर्बंध ...
मुंबई काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्यापारी आणि दुकानदार शासनाचे सर्व नियम, अटी आणि निर्बंध पाळायला तयार आहेत. स्वखर्चाने कामगारांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासही तयार आहेत. त्यामुळे हवे तर सरकारने कडक अटी, नियम लादावेत; पण व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे लाखो कामगारांचा रोजगार वाचेल, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी गुरुवारी दिली.
काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप म्हणाले की, गेल्या वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे सर्व दुकानदार आणि व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातून सावरत असतानाच आता पुन्हा एकदा अंशकालीन लाॅकडाऊनमुळे लाखो कामगार बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनऐवजी कठोर नियम लावून व्यवसायाची परवानगी द्यावी. तसेच सध्या राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने १० एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत दहा हजार बाटल्या रक्त संकलित केले जाणार आहे. मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रांमध्ये या कालावधीत रक्तदान शिबिर आयोजित केले जाणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे स्थानिक नेते व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्या त्या विभागात रक्तदान शिबिरांचे संकलन करतील. पहिले रक्तदान शिबिर १२ एप्रिल रोजी उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये मालाड-मालवणी विभागात घेतले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईतील कोरोना संसर्ग लक्षात घेता झेड-७१ सरफेस सॅनिटायजरचा वापर वाढवावा. याचा वापर करूनच यापूर्वी वरळी, धारावीतील संक्रमण रोखण्यात पालिकेला यश आले होते. आता कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने तातडीने या सॅनिटायजरचा वापर मुंबईतील सर्व चाळींमध्ये व सार्वजनिक शौचालयांमध्ये करावा, अशी आमची मुंबई महापालिका आयुक्तांकडे मागणी आहे. या पत्रकार परिषदेत कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, कोषाध्यक्ष भूषण पाटील, संदेश कोंडविलकरही उपस्थित होते.