मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहोपाडा शहरात दर रविवारी आठवडा बाजार भरतो. यावेळी रसायनी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. मात्र बाजारपेठेतील अरुंद रस्ता, वाहतूक कोंडी व भाजी विक्र ेत्यांनी रस्त्यावर मांडलेले बस्तान आदी समस्यांमुळे मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरला असून बाजारपेठेतील गर्दीमुळे चालणेही कठीण बनले आहे.आठवडा बाजारच्या दिवशी तर बाजारातून वाट काढताना ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागते. रविवारी बाजारपेठ खचाखच भरत असल्याने फळे विक्रेते, कापड विक्रेते, भाजी विक्र ेते ऐन रस्त्यातच तळ ठोकून बसतात. त्यामुळे अनेकदा परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही उद्भवते. या बाजारात कापड, कटलरी तसेच सौंदर्यप्रसाधने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटण्यात येत असून स्थानिक प्रशासनाने जागेचे योग्य नियोजन केल्यास दुकानदारांबरोबरच ग्राहकांसाठीही सोयीचे होईल. आठवडा बाजारातील वस्तू या तुलनेने स्वस्त मिळत असल्याने स्थानिक ग्राहकांबरोबरच ग्रामीण भागातून ग्राहकवर्ग खरेदीसाठी येतात. शहरांतील अन्य दुकांनापेक्षा कमी किमतीत मिळत असल्याचे महिला ग्राहकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
मोहोपाड्यातील बाजारपेठेचा कोंडतोय श्वास
By admin | Published: May 24, 2015 10:41 PM