जे.जे.रुग्णालयातील तज्ज्ञांच्या राजीनाम्याची उच्चस्तरीय चौकशी करा; छगन भुजबळांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 09:10 PM2023-06-01T21:10:06+5:302023-06-01T21:10:34+5:30
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ज्येष्ठ डॉक्टरांनी जे.जे.रुग्णालयातील आपल्या अध्यापक पदाचा राजीनामा दिला. या गंभीर घटनेबाबत छगन भुजबळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
मुंबई : जे.जे.वैद्यकीय रुग्णालयातील नामवंत तज्ज्ञांच्या राजीनाम्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ज्येष्ठ डॉक्टरांनी जे.जे.रुग्णालयातील आपल्या अध्यापक पदाचा राजीनामा दिला. या गंभीर घटनेबाबत छगन भुजबळ यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे अतिशय नामांकित रुग्णालय आहे.
जे. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या तक्रारीवरुन रुग्णालयाच्या नेत्र शल्यचिकित्सक व गोरगरिबांसाठी मदत करणाऱ्या आणि मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रासाठी सेवा बजावणाऱ्या पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर विभागाच्या अतिशय जेष्ठ असलेल्या नऊ अध्यापकांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये डॉ. रागिनी पारेख, डॉ. प्रीतम सामंत, डॉ. स्वरजीसिंग भट्टी, डॉ. अश्विन बाफना, डॉ. हेमालिनी मेहता, डॉ. शशी कपूर, डॉ. दिपक भट व डॉ. सायली लहाने यांचा समावेश आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे वर्षभरापासून मानसिक त्रास देत होत्या, अशा प्रकाराचा गंभीर आरोप राजीनामा दिलेल्या डॉक्टरांनी केला आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
राजीनामा दिलेले प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासह नऊ डॉक्टरांनीही संयुक्त निवेदन जारी केले आहे. यामध्ये मार्ड संघटनेच्या माध्यमातून २८ निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीवरून डॉ. अशोक आनंद यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यावर आक्षेप घेण्यात आला. डॉ. आनंद यांच्यावर एका महिलेने छेडछाडीचा आरोप केल्यावर डॉ. रागिणी पारेख यांनी या प्रकरणाचा तपास केला. तसेच डॉ. आनंद यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह अनेक डॉक्टरांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत पोलिसांकडे तक्रार केली होती. अधिष्ठाता यांनी त्रास देण्यासाठी जाणूनबुजून डॉ. आनंद यांना चौकशी समितीचे अध्यक्ष केले आहे, असा आरोप राजीनामा दिलेल्या डॉक्टरांनी केला आहे. ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
जे.जे.रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सक विभागातील सर्वच अध्यापकांनी राजीनामे दिल्याने संपूर्ण नेत्ररोग विभागच बद करण्याची नामुष्की आता जे. जे रुग्णालयावर ओढावणार असून त्यातून रुग्णांचे हाल होणार आहेत. जे. जे रुग्णालयातील नेत्रशल्यचिकित्सा विभागात दुर्धर आजारांवर देखील उपचार होतात. त्यामुळे संपूर्ण विभाग बंद पडल्यास रुग्णांची तारांबळ उडणार आहे. या डॉक्टरांच्या राजीनाम्यामुळे अत्यंत प्रसिद्ध असणाऱ्या हॉस्पिटल मधील सामान्य रुग्णांना त्यांच्या गंभीर आजारावर उपचार मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. या प्रकरणात हे ९ डॉक्टर्स त्यांच बरोबर मार्डचे विद्यार्थी- विद्यार्थीनी यांचे म्हणणे ऐकून घेऊन सदर प्रकरणात शासनाने हस्तक्षेप करावा व त्यांचे राजीनामे परत घेण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येऊन अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याबाबत शासनाने कारवाई करावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.