ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्तव्य अभियान राबवणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:24 AM2024-07-30T06:24:29+5:302024-07-30T06:24:36+5:30
ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरू असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, नुकत्याच झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीत विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. सन २०४७ पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. सध्या शासनाने ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना सुरू केली असून त्याद्वारे थेट डीबीटीद्वारे लाभाचे वितरण करण्यात येत आहे. सोबतच एसटी प्रवास सवलत देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात येईल. या केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिमेंशिया, अल्जायमर या आजाराबाबत सहायता उपलब्ध करून देण्यात येईल.
मुख्यमंत्री म्हणाले....
इन्फ्लुएन्जा, न्यूमोनिया लसीकरणासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्ट राबवावा. त्यानंतर राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून या लसी उपलब्ध करून द्याव्यात. ज्येष्ठांच्या दारापर्यंत आरोग्य सुविधा नेण्यासाठी लवकरच हॉस्पिटल ऑन व्हील्स संकल्पना राबविणार. रेल्वे प्रवासात ज्येष्ठांना देण्यात येणारी सवलत पुन्हा सुरू करण्यासाठी आणि व्हीलचेअरसह इतर आवश्यक साहित्यांवरील आणि उपचारांच्या बिलावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे विनंती करणार.