Join us

शाळांच्या परीक्षा घ्या १२ एप्रिलपर्यंत; शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 07:31 IST

मुंबई : शासनाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश ...

मुंबई : शासनाने इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा यंदा मार्चऐवजी ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत घेण्याचे आदेश जारी केले. परीक्षा उशिरा होणार असल्याने मुलांचे सुट्टीत बाहेरगावी जाण्याचे शिक्षक व मुख्याध्यापकांनी केलेले परीक्षेचे नियोजन बिघडले आहे. त्यामुळे आता १२ एप्रिलपर्यंत शासनाने परीक्षा आटोपावी, असे शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी निवेदनात नमूद केले आहे.

इयत्ता पहिली ते नववीच्या दरवर्षी मार्च महिन्यात परीक्षा सुरू होऊन एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपतात. यंदा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने शिक्षण आयुक्तांकडे ८ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत परीक्षा घ्याव्यात, असे वेळापत्रक दिले. निपुण भारतची देखील कार्यवाही करावी, शासन निर्णय लगोलग जारी झाला.

शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष

निपुण भारत उपक्रमामुळे शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालक सर्वांचीच अडचण झाली. मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी शासनाकडे पत्र लिहून त्याबाबत नाराजी व्यक्त केली.

वार्षिक परीक्षा १२ एप्रिलपर्यंत घ्याव्यात, असा प्रस्ताव देत त्याचे वेळापत्रक देखील शासनाला पत्राद्वारे देण्यात आले. आता शासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझी मुलगी आठवीत चेंबुरच्या नारायण गुरू शाळेत शिकते. दरवर्षी १३ एप्रिलपर्यंत परीक्षा संपतात. त्यामुळे आम्ही दोन महिने आधीच बाहेरगावी जाण्यासाठी १५ ते १६ एप्रिलचे रेल्वेचे आरक्षण केले आहे. सरकारच्या निर्णयामुळे आता ते रद्द करावे लागणार. तिकिटाचा खर्च देखील वाया जाणार - नरेश पढे, पालक

प्रत्येक वर्षी १० ते १२ एप्रिलपर्यंत परीक्षा संपते. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासोबत इतरही शैक्षणिक कामे असतात. त्यामुळे आम्ही शासनाला ८ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत परीक्षा पूर्ण कराव्यात, असे सुचविले आहे - महेंद्र गणपुले, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ 

टॅग्स :मुंबईशाळा