मुंबई- दिंडोशी, नागरी निवारा संकुल येथे शासकीय जमिनीवरील ११३ गृहनिर्माण संस्था असून येथील गृहनिर्माण संस्थांना दैनंदिन कामकाजात अनेक अडथळे येतात. त्यामुळे जमिनीच्या हस्तारणाविषयी माहिती,निवडणूक प्रक्रिया , स्वयं विकास याबद्दल माहिती अश्या सर्व प्रश्नाचे योग्य आणि उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक आमदार, विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाने काल मुंबई जिल्हा उपनगर कॉ ऑप हाउसिंग फेडरेशन लि. चे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या प्रयत्नाने आणि नागरी निवारा फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नागरी निवारा सांस्कृतिक केंद्र,संकल्प सहनिवास येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शक तज्ञ सल्लागार म्हणून लाभलेले सह गृह निर्माण संस्थांच्या दैनंदिन प्रश्न आणि कायदेशीर माहिती रमेश प्रभू यांनी दिली, शासकीय जमिनीवर सरकारच्या अटी शर्ती आणि वेगवेगळ्या शासन निर्णयाला आव्हान देत त्यात सुधारणा करून सभासदांना सुस्पष्ट अशी माहिती सलील रमेशचन्द्रन यांनी दिली.
सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास किंवा स्वयं विकास त्यासाठी बँक मुंबई जिल्हा बँक कश्या पद्धतीने सहकार्य करते त्याच प्रमाणे मुंबई जिल्हा उपनगर सहकारी हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांनी फेडरेशनच्या कार्याविषयी तसेच येथील संस्थांना त्याचे कसे फायदे आणि लाभ मिळेल याबाबत माहिती दिली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका बाबत फेडेशनच्या सदस्या ॲड.सुनीता गोडबोले यांनी सविस्तर माहिती दिली. संपूर्ण कार्यक्रमासाठी नागरी निवारा संकुलातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सहकार गृहनिर्माण संस्थांच्या उपविधी प्रमाणे काम करताना शासकिय जमीनी वरील संस्था बाबत वेगळे धोरण असावे त्याची स्पष्ट माहिती असावी. अश्या सहकारी गृहनिर्माण संस्था यांना कोणताही आर्थिक पाठबळ नसते,ते उभे करण्यासाठी शासनाने योग्य निर्णय घ्यावे . तसेच ज्या संस्थांचे मालमत्ता पत्रक मिळाले आहेत त्यांचे कन्व्हेयन्स डीड झाले आहे त्यांना संपूर्ण अधिकार लाभले पाहिजे . शासनाचे भोगवटा क्रमांक १ होण्यासाठी आर्थिक अटी बाबत फेरविचार व्हावा ,अशी मागणी करण्याचे पत्र नागरी निवारा फेडरेशनच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांना देण्यात आले. या बाबत फेडरेशन सोबत शासन दरबारी पाठपुरावा करून नक्की मार्ग काढला जाईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
या शिबिरातून येथील गृहनिर्माण संस्थांच्या सर्व प्रश्नाचे उत्तम मार्गदर्शन मिळून योग्य निराकरण झाल्याबद्धल त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी फेडरेशनचे आभार मानले.यावेळी नागरी निवारा फेडरेशनचे सचिव मुकुंद सावंत आणि उपाधक्ष शैलेश पेडामकर यांनी उपस्थित मान्यवर आणि सर्व मुंबई जिल्हा उपनगर फेडरेशन च्या कार्यकारणीचे आभार व्यक्त केले.