लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
मुंबई विद्यापीठातील कनिष्ठ टंक लिपिक (स्थायी/ हंगामी) आणि कनिष्ठ लघुलेखक यांच्या युनिकोड मराठीच्या प्रशिक्षणामुळे विद्यापीठाच्या संगणकीय कामांमधे सुसूत्रता येईल आणि वेगही वाढेल, असे मत मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले. मुंबई विद्यापीठामधे मराठी अभ्यास केंद्राच्या ‘तंत्रस्नेही मराठी’ या गटाच्या वतीने घेतलेल्या युनिकोड आणि इनस्क्रिप्ट प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते बोलत होते.
प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजाच्या मार्गदर्शनार्थ १९ डिसेंबर २०२० रोजी मुंबई विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्र आणि मराठी अभ्यास केंद्राचा तंत्रस्नेही मराठी गट यांच्या संयुक्त विद्यमाने ही ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत जवळपास १३० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यशाळेमध्ये मराठी अभ्यास केंद्राच्या तंत्रस्नेही गटाचे प्रमुख आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनचे वृत्तनिवेदक तुषार पवार यांनी मार्गदर्शन केले. युनिकोड ही संकल्पना, त्याआधारे संगणकात मराठीचा वापर आणि त्यासाठीच्या इनस्क्रिप्ट कीबोर्डची ओळख याबाबतीत त्यांनी प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले. ही कार्यशाळांची मालिका असून, या मालिकेतली ही पहिली कार्यशाळा होती. सुरुवातीला डॉ. दीपक पवार यांनी मराठी अभ्यास केंद्राच्या उपक्रमांची माहिती सांगितली.