नवलेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:24 AM2020-12-11T04:24:01+5:302020-12-11T04:24:01+5:30
मुंबई : मराठी भाषा विभागाच्यावतीने १० ते १६ डिसेंबर या काळात नवलेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर ...
मुंबई : मराठी भाषा विभागाच्यावतीने १० ते १६ डिसेंबर या काळात नवलेखकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यशाळेतून नवलेखकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सरकारच्या साहित्य-संस्कृती मंडळ आणि विश्व मराठी परिषद या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आठवडाभर नवलेखकांसाठी कथा, कविता, संशोधन, अनुवाद, ब्लॉग लेखन अशा वैविध्यपूर्ण विषयावर निःशुल्क लेखन कार्यशाळा होत आहे. मराठी साहित्यविश्वातील अनेक नवलेखक या ऑनलाइन लेखन कार्यशाळांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाणार आहेत. मराठी साहित्यातील समृद्ध कथा, कविता, नाटक, कादंबरी, बालवाङ्मय व ललितगद्य प्रकारात नवलेखकांना ज्येष्ठ प्रतिभावंत साहित्यिकांचे यानिमित्ताने मार्गदर्शन लाभेल, अशी माहिती मराठी भाषा विभागामार्फत देण्यात आली.
भागवत परंपरेतल्या सप्ताहातून वारकरी जसे संताच्या सहिष्णू आणि समताधिष्ठित शिकवणुकीची ऊर्जा घेऊन बाहेर पडतात, तशीच लेखनाची, सृजनाची नवी उर्मी व ऊर्जा, प्रेरणा घेऊन या कार्यशाळेतून नवलेखक बाहेर पडतील, असा आशावाद मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.