मुंबई : गणेश विसर्जनाच्या वेळी गणपती पाहताना अडथळा येतो, म्हणून बेस्टच्या वाहकाला मारहाण करणाऱ्या आणि गाडीचेही नुकसान करणाऱ्या चौघांवर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
२९ सप्टेंबरला बेस्टचे कंडक्टर ओमकार पडियार (२२) व त्यांचे सहकारी चालक निवृत्ती वायकर (५३) हे रात्री १२.१५ला भाईंदर रेल्वे स्टेशन पूर्ववरून मालवणी बस डेपोकडे गोराईमार्गे ते रूट क्रमांक ७२० ची बस घेऊन चालले होते. एलटी रोडवर गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे बोरीवलीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला. त्याच वेळी समोरून दुसरी बस येत असल्याने, वायकर यांनी त्यांची गाडी डाव्या बाजूला घ्यायची असल्याचे पडियारना सांगितले.
पडियार हे दरवाज्यात उभे राहत रस्त्यातील लोकांना बाजूला करू लागले. त्यावेळी तिथे चार इसम बसले होते, ज्यांना या बसमुळे गणपती दिसत नव्हते. तेव्हा त्यांनी पडियार यांना बस बाजूला घेण्यास सांगत वादावादी सुरू केली व शिवीगाळ करून नंतर मारहाणही केली.