मुंबईमधील आकडेवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनुभव, जिद्द याहून मौल्यवान गोष्ट दुसरी नाही, असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. कारण कोरोनामुळे एकीकडे मरण स्वस्त झाले असताना जगण्याचा अनुभव सर्वाधिक घेतलेल्यांनी या संकटावर आत्मविश्वासाने मात केली. कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही बाब लक्षात येईल. मुंबईत ९० वर्षांवरील २,३४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
मुंबईत आतापर्यंत ९० वर्षांहून अधिक वयोगटातील २,५७७ रुग्ण आढळले. त्यातील २,३४८ जण कोरोनातून बरे झाले, तर २२९ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले असतानाही ज्येष्ठ नागरिकांनी याेग्य उपचार व आत्मविश्वासाच्या जोरावर या विषाणूविरोधात यशस्वी लढा दिला.
विशेष म्हणजे वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची चर्चा सुरू असताना या वयोगटाने मात्र या चर्चेस पूर्णविराम दिला. मुंबईचा विचार करता कोरोनाची लागण झालेल्यांत ३० ते ३९ या वयोगटातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे, तर ६० ते ६९ वयोगटातील मृत्यूसंख्या अधिक आहे.
...............
१) ९० पेक्षा जास्त वयाचे एकूण काेराेना पॉझिटिव्ह - २,५७७
काेराेनामुक्त - २,३४८
मृत्यू - २२९
मुंबईतील काेराेनाचे एकूण रुग्ण - ७,१२,३३९
मृत्यूसंख्या - १५,०६६
उपचाराधीन रुग्ण - १५,७८६
कोरोनातून बरे झालेले रुग्ण - ६,७९,२५८
(आकडेवारी ८ जूनपर्यंतची)
५० ते ७० वयोगटात सर्वाधिक मृत्यू
मुंबईत ५० ते ७० या वयोगटातील बाधितांचे प्रमाण आणि मृत्यूसंख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत या गटातील २ लाख ३ हजार १७४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. त्यातील ७ हजार ४०४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील पुरुषांचे प्रमाण ६० टक्के, तर महिलांचे प्रमाण ४० टक्के इतके आहे.
आजीबाईंनी घरी राहून केली कोरोनावर मात
- कांदिवलीत राहणाऱ्या सुहासिनी रमेश जोशी या आजीबाईंना कोरोनाची लागण झाली. ज्येष्ठ नागरिकांना या विषाणूचा सर्वाधिक धोका असल्याने रुग्णालयात उपचार घेतल्यावाचून पर्याय नाही, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती; पण आजीबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी घरीच राहून उपचार घेतले.
- पतीचे वय नव्वदीच्या घरात असल्याने त्यांना लागण होऊ नये यासाठी काळजी घ्यायची होती. कोरोना प्रतिबंध सर्व नियमांचे पालन आणि दुर्दम्य इच्छाशक्ती, याेग्य उपचारांच्या जोरावर त्यांनी काेराेनाला हरवले.
..........................................