जामसूतकर कुटुंब; सकारात्मकतेने केली काेराेनावर मात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना बरा होतो. फक्त हवा तो आत्मविश्वास, सकारात्मकता. आम्ही ज्या रुग्णालयात दाखल होतो त्या रुग्णालयातील आया, नर्स, वॉर्ड बाॅय हे सर्व अपुऱ्या सेवासुविधा असतानाही रुग्णसेवेच्या तळमळीतून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवित होते. त्यांना जगण्याचे बळ देत होते. पॉझिटिव्हीटी देत होते. त्यांच्याकडे पाहून, त्यांनी दिलेल्या जगण्याच्या प्रेरणेमुळेच आम्ही कोरोनासारख्या आजारातून बरे झालो, अशी प्रतिक्रिया जामसूतकर कुटुंबाने दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधांपेक्षा आत्मविश्वास जास्त काम करतो. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वास गमावू नका, असेही त्यांनी सांगितले.
राजेश जामसूतकर यांनी सांगितले की, आम्ही देवनार म्युनिसिपल कॉलनीमध्ये विमल को. ऑपरेटिव्ह सोसायटीत वास्तव्यास आहोत. मी एका खासगी कंपनीत ऑफिस सुपरवायझर म्हणून नोकरीस आहे. माझे बाबा पांडुरंग जामसूतकर, आई वनिता जामसूतकर, मी राजेश, पत्नी नेहा आणि मुलगी मैथिली अशाप्रकारे आमच्या संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावरील उपचारासाठी मी सुरुवातीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालो. मला श्वसनाचा जास्त त्रास होऊ लागला. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल झालो. माझी पत्नी आणि मुलगी मसिना रुग्णालयात दाखल होती. आई-बाबांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अशा काळात अनेक अडचणी असतात. तुम्हाला आर्थिक समस्या असतात. मानसिक ताण असतो. तो प्रत्येकालाच असतो. आम्हालाही होता. मात्र कोरोनाला हरवायचे असेल तर आपल्यातील सकारात्मकता महत्त्वाची आहे. मी बरा होणार. माझ्या कुटुंबात, माझ्या घरी बरा हाेऊन आनंदाने परत जाणार, असा आत्मविश्वास कायम ठेवला तर आपण या कोरोनातून सहज बरे होतो. आत्मविश्वास हा औषधांपेक्षा जास्त काम करतो. आमच्याकडे तो होता, म्हणून आम्ही बरे झालो, असे राजेश जामसूतकर यांनी सांगितले.
* जीवावर उदार होत काम
कस्तुरबा रुग्णालयात आया, नर्स साधा मास्क परिधान करून रुग्णांची सेवा करत होत्या. कोविड सेंटरसाठी पीपीई किट होते. मात्र त्या बाहेर जे लोक होते त्यांना काहीच सेवा नव्हत्या. कोणत्याही सेवा नसताना स्वत:च्या जीवावर उदार होत हे लोक रुग्णांची सेवा करत आहेत. तुम्ही नक्की बरे होणार, असा दिलासा येथील नर्स, वॉर्डबाॅय सतत सर्व रुग्णांना देत आहेत. आमच्या बरे हाेण्यामध्ये या सर्वांची सेवा आहे, असे जामसूतकर कुटुंबाने सांगितले.
* ५० टक्के निधी द्या
नगरसेवक, आमदार आणि खासदार यांचा ५० टक्के निधी हा कोरोनावरील उपचारासाठी खर्च केला पाहिजे. यात कोणत्याही पक्षाचा विचार करू नका. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा निधी कोरोनावरील उपचारासाठी वापरला पाहिजे. चौक, फुटपाथ, नाले अशा कामांसाठी निधी वापरण्यापेक्षा हा निधी आता कोरोनावरील उपचारासाठी वळविला पाहिजे. जर का हा निधी मिळाला तर पुढच्या सहा महिन्यात आरोग्याच्या समस्या बऱ्याच अंशी निकाली निघतील.
* आरोग्य सेवा बळकट करणे गरजेचे
आरोग्य सेवा सुविधा वाढविण्यासाठी राज्याने, केंद्राने काम केले पाहिजे. तत्परता हवी. प्रत्यक्षात, कोरोनाच्या रुग्णांना आरोग्य सेवा देताना आपली तारांबळ उडाली आहे. याचा अर्थ आरोग्य सेवेला प्राधान्य दिले पाहिजे. आपण आपली आरोग्य सेवा बळकट केली पाहिजे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाण पाहिजे. मात्र अधिकारी छक्के-पंजे खेळतात. त्यांनी असे करता कामा नये. आरोग्य सेवेला प्राधान्य द्या. मग माणसे मरणार नाहीत.
--------------