आर्थर रोडच्या श्री गणेश बालमित्र मंडळाने उभारला शंभू राजेंचा गोपनीय इतिहास
By शिवराज यादव | Published: August 28, 2017 05:41 PM2017-08-28T17:41:12+5:302017-08-28T17:42:57+5:30
छत्रपतींच्या अखंड प्रवासाचा गोपनीय ठरलेला इतिहास ‘श्री गणेश बालमित्र मंडळ‘ यांनी आपल्या ‘छावा‘ या चलचित्र देखाव्यातून मांडला आहे.
मुंबई. दि. 26 - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वच जाणतो. त्यांच्या पश्चात जर महाराष्ट्राचा विचार केला असता एका वाघाचं चित्र डोळयांसमोर येतं ते म्हणजे शिवपुत्र संभाजी महाराज. वाघाचं काळीज असलेला, एकही युध्द न हारलेला, शत्रू नाव ऐकताच थर कापणारा, विविध भाषेचं ज्ञान आणि अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला असा मर्द मराठा महाराष्ट्राला लाभला. अवघ्या ३१ व्या वर्षात त्यांनी आपल्या राज्यासाठी आपले प्राण वेचले. अशा या छत्रपतींच्या अखंड प्रवासाचा गोपनीय ठरलेला इतिहास ‘श्री गणेश बालमित्र मंडळ‘ यांनी आपल्या ‘छावा‘ या चलचित्र देखाव्यातून मांडला आहे.
सोबतच आपल्या राजांनी जिंकलेले, इतिहास घडवलेले गडकिल्ले हे फक्त पर्यटन स्थळे नसून महाराष्ट्राचा आदर्श आणि आणि कणा आहेत, ते आपण जपले पाहिजे, असा देखाव्याच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.
श्री गणेश बालमित्र मंडळाचे यंदा गणेशोत्सवाचे 23वे वर्ष. गणेशोत्सवादरम्यान समाजजागृती वा सामान्यांचे प्रश्न मांडणारा चलचित्र देखावा मंडळाच्यावतीने दरवर्षी उभारला जातो. यंदाही मंडळाने ‘छावा, संभाजी राजेंचा गोपनीय इतिहास’ या विषयावर देखावा साकारला आहे. याशिवाय मंडळाची लक्षवेधी बाब ठरते ती म्हणजे नावातील बालमित्र शब्दाप्रमाणेच मंडळाचे सर्व पदाधिकारी कुणी शालेय शिक्षण तर कुणी नुकतेच महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थीमित्र आहेत. ज्यांनी हा विषय अतिशय सुंदर प्रकारे मांडला आहे.