कन्फर्म! आता कोकणवासीयांसाठी १० दिवसांचा क्वारंटाइन, शासन आदेश आला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 10:26 PM2020-08-07T22:26:31+5:302020-08-07T22:27:16+5:30
दोन दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारनं १४ दिवसांऐवजी १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी केल्याची घोषणा केली होती.
मुंबई- कोकणात गणपतीला गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. कोकणात येताना ई-पास घेणे, क्वारंटाइन कालावधीचं काटेकोर पालन करणं अशा अनेक अटी आणि शर्थी ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी वाहतुकीवर निर्बंध लादल्याचे शासनाकडून सांगण्यात येत होते. दोन दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारनं १४ दिवसांऐवजी १० दिवसांचा क्वारंटाइन कालावधी केल्याची घोषणा केली होती.
अखेर त्याचा आज शासन आदेश निघालेला आहे. १२ ऑगस्ट २०२०पर्यंत गणेशोत्सवासाठी जे नागरिक एसटी किंवा अन्य खासगी वाहनांनी कोकणात जातील, त्यांच्यासाठी १० दिवसांचा गृह विलगीकरण करण्यात येईल. त्याकरिता नागरिकांना कोणत्याही कोविड १९च्या चाचणीची आवश्यकता राहणार नाही. १२ ऑगस्टनंतर जे नागरिक कोकणात जातील त्यांना कोरोना चाचणी करणं बंधनकारक राहील.
सदर चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना प्रवासकरता येणार आहे. एसटीनं जाणाऱ्या प्रवाशांना ई-पासची आवश्यकता नाही. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी https://covid19.mhpolice.in/ या पोर्टल जाऊन गणेशोत्सव प्रवासासाठी कॉलममधून अर्ज करावा. गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्याही स्वतंत्र नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही.