युती-आघाडीला विजयाची पक्की खात्री; मतदारांचा कौल कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:58 AM2019-05-02T03:58:55+5:302019-05-02T03:59:18+5:30

यंदा सर्वत्र मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र असताना दक्षिण मुंबईत मात्र मतदानात किंचित घट दिसून आली

Confirmation of victory for alliance-led alliance; Who is the voter? | युती-आघाडीला विजयाची पक्की खात्री; मतदारांचा कौल कुणाला?

युती-आघाडीला विजयाची पक्की खात्री; मतदारांचा कौल कुणाला?

Next

शेफाली परब-पंडित

यंदा सर्वत्र मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र असताना दक्षिण मुंबईत मात्र मतदानात किंचित घट दिसून आली. अमराठी मतदार अधिक असलेल्या या मतदारसंघातील विजयाबाबत काँग्रेस आशावादी आहे. तर भाजपच्या व्होट बँकमुळे शिवसेनाही यशाची खात्री बाळगून आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढतीविषयी सर्वांमध्येच उत्सुकता आहे. उद्योगपतींचा मिलिंद देवरा यांना पाठिंबा, काँग्रेसच्या समर्थनार्थ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण अशा राजकीय घडामोडींमुळे ही लढत अटीतटीची ठरली. त्याचा निकालही तितकाच औत्सुक्याचा बनला आहे.

६० टक्क्यांहून अधिक अमराठी मतदारांची संख्या असलेला हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र गुजराती, मारवाडी, जैन मतदारांच्या जोरावर भाजपने प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला येथे टक्कर दिली. तसेच १९९६, १९९९ मध्ये विजयही मिळवला. २००४ ते २०१४ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसकडेच होता. २०१४ मध्ये मोदी लाटेत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते मिलिंद देवरा यांचा तब्बल एक लाख २८ हजार मताधिक्याने पराभव केला.

यावेळेस हा मतदारसंघ परत मिळवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तर शिवसेनेने भाजपची मते गृहित धरून आपला प्रचार सुरू ठेवला. या मतदार संघात शिवसेना-भाजपकडे २८ नगरसेवक, तर चार आमदार आहेत. तर भायखळा विधानसभा मतारसंघात एमआयएम आणि मुंबादेवीत काँग्रेसचा आमदार आहे. यंदा कुलाबा, भायखळा, शिवडी आणि वरळी विधानसभेत २०१४ च्या तुलनेत दोन ते तीन टक्के कमी मतदान झाले. मलबार हिलमध्ये अडीच टक्के, तर मुंबादेवीत एक टक्का मतदान वाढले. यामुळे ही लढत अटीतटीची असल्याचे स्पष्ट होते.

गेल्या विधानसभेत युती नसताना भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघात भाजप दुसऱ्या क्रमाकांवर होते. तर कुलाबा आणि मलबार हिलमध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराचे मताधिक्य दुप्पट होते. तसेच बालेकिल्ला असलेल्या वरळी आणि शिवडीमध्ये शिवसेनेने मोठ्या फरकाने प्रतिस्पर्धींचा पराभव केला होता. ४० टक्के मराठी मते आपल्याकडे वळविण्यासाठी काँग्रेसने मनसेला जवळ केले. राज ठाकरे यांच्या सभांनी तसे वातावरणही निर्माण केले. परंतु, मनसे कार्यकर्त्यांमध्येच काँग्रेसला मत देण्याबाबत संभ्रम दिसून आला. त्यामुळे भायखळा आणि शिवडीचा काही भाग वगळता मनसे फॅक्टरचा हवा तितका प्रभाव दिसून येणार नाही.

भायखळा आणि मुंबादेवीत ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन
आघाडीचा उमेदवार उभा केल्यामुळ मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. मुंबादेवीतील मतदानात वाढही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. उच्चभ्रू वस्ती असलेल्या मलबार हिलमध्ये मतदानाचा टक्का यावेळेस ५३.६७ टक्क्यांवरून ५६.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. येथील गुजराती, जैन मतदार भाजपचे पारंपारिक मतदार आहेत. मात्र ही मते मिळवण्यासाठी काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न करून भाजपविरोधी वातावरणही निर्माण केले होते.

मतदानाच्या दिवशी मराठी भाषिकांबरोबरच अमराठी मतदारांनी मोठ्या मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या. मतदारांची मते नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार याच अंदाज मात्र शिवसेना-भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही येत नव्हता. एकूणच दक्षिण मुंबई मतदार संघातील राजकीय चित्र संभ्रमात टाकणारे होते.

Web Title: Confirmation of victory for alliance-led alliance; Who is the voter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.