लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पर्यावरणास घातक तसेच मुंबई तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्लास्टिक विरोधात मुंबई महापालिकेकडून दरवर्षी कारवाई केली जाते. जप्त केलेल्या प्लास्टिकपासून बाकडे, बेंच बनवण्याची पालिकेची योजना आहे त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थाही पुढे सरसावल्या आहेत; मात्र प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची योजना अद्यापपर्यंत स्वप्नवतच राहिली आहे. स्वयंसेवी संस्थासोबत पालिकेच्या अनेक महिन्यांपासून केवळ जोर बैठका सुरू असून पुढे काहीच झालेले नाही. दरम्यान, जप्त केलेले प्लास्टिक पालिका गोदामात ठेवते. या प्लास्टिकचा लिलाव केला जातो. परिणामी प्लास्टिक पुन्हा बाजारात येते. त्यामुळे प्लास्टिकचा उपद्रव सुरूच असतो.
मुंबईत प्लास्टिक बंदी असतानाही फेरीवाले, मॉल आणि बाजारपेठांमध्ये सर्रास प्लास्टिकची विक्री केली जाते. हे प्लास्टिक जप्त करण्यासाठी पालिका दरवर्षी मोहीम राबविते. कोरोनात थंडावलेली कारवाई पालिकेने पुन्हा सुरू केली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांच्या मदतीने प्रत्येक वॉर्डात पाच जणांचे पथकही स्थापन केले आहे. सोमवारपासून या पथकाने प्रत्येक वॉर्डात धडक देण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी ८७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. यामुळे पालिकेच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
आठ महिने उलटले; पण निर्णय नाहीच
- जप्त केलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याचा निर्णय डिसेंबर २०२२ मध्ये घेण्यात आला.
- पालिकेला उपयोगी अशा प्लास्टिकच्या विविध वस्तू बनविण्याचे प्राथमिक प्रेझेंटेशन संस्थांनी पालिकेला दिले आहे, मात्र अद्याप काहीच झालेले नाही.
- येत्या पंधरा दिवसांत यासंदर्भात पुन्हा बैठक घेणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मोल्डची मदत
जप्त केलेल्या प्लास्टिकवर संस्थेची मदत घेऊन प्रक्रिया केली जाणार आहे. अशा प्रकारचे बेंच यापूर्वीच बनविण्यात आले असून ते पालिकेत ठेवण्यात आले आहे. हे प्लास्टिक आधी वितळवले जाईल व मोल्डच्या मदतीने बेंच, बाकडे आणि इतर उपयोगी वस्तू तयार केले जातील.
प्रोजेक्ट मुंबई
पालिकेने हे प्लास्टिक वितळवून त्यापासून गार्डनमधील बाकडे, कार्यालयात बसविण्यासाठी बेंच व इतर उपयोगी वस्तू बनविण्याचा निर्णय घेतला. यासाठी बॉम्बे फर्स्ट आणि प्रोजेक्ट मुंबई या संस्थांनी स्वारस्य दाखवले असून या प्रकल्पासाठी पालिका प्रशासनासोबत अनेकदा बैठकाही झाल्या आहेत.