‘संघर्ष’ संपला, उरली ‘संस्कृती’

By admin | Published: August 18, 2016 05:30 AM2016-08-18T05:30:47+5:302016-08-18T05:30:47+5:30

दहीहंडीची उंची आणि बालगोविंदाच्या वयोमर्यादेबाबत उच्च न्यायालयाने लागू केलेल्या निर्बंधावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शिक्कामोर्तब केल्याने ठाण्यातील गोविंदा आणि दहीहंडी

'Conflict' ended, 'culture' | ‘संघर्ष’ संपला, उरली ‘संस्कृती’

‘संघर्ष’ संपला, उरली ‘संस्कृती’

Next

- स्नेहा पावसकर,  ठाणे

दहीहंडीची उंची आणि बालगोविंदाच्या वयोमर्यादेबाबत उच्च न्यायालयाने लागू केलेल्या निर्बंधावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शिक्कामोर्तब केल्याने ठाण्यातील गोविंदा आणि दहीहंडी आयोजकांमध्येही निराशेचे वातावरण पसरले आहे. कोणी ‘संस्कृती’ जपत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर कोणी या चढाओढीच्या ‘संघर्षा’तून बाहेर पडत दहीहंडीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दहीहंडीची उंची २० फूटापेक्षा अधिक असू नये तसेच १८ वर्षाखालील गोविंदांचा पथकात सहभाग करू नये, या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मोहर उमटवल्याने मुंबईसह ठाण्यातील गोविंदाच्या मनातील शेवटची आशा मावळली आहे. मात्र असे असले तरी न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होऊ देणार नाही. चार ते पाच थर लावत पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करू, अशी भूमिका जिल्हा दहीहंडी समन्वय समितीने घेतली आहे.
दुसरीकडे ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला जागतिक स्तरावर नेणाऱ्या आयोजकांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदा ठाण्यात दहीहंडी उत्सव साजरा होणार की दहीहंडीच्या या पंढरीत शुकशुकाट राहणार याबाबत उत्सुकता आहे.

गोविंदा पथकांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे. मुंबई हायकोर्टाने २०१४साली केलेल्या मनाईला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले असता सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा १२ वर्षाखालील मुलांच्या गोविंदा पथकातील समावेशाला परवानगी दिली होती. त्यामुळे यावेळीही सर्वोच्च न्यायालय गोविंदांच्या बाजूने निर्णय देईल असे वाटले होते. मात्र शासन आमची बाजू समजावून सांगण्यात कुठे तरी कमी पडले. तरीही निर्णयाच्या अधीन राहून उत्सव साजरा करू.
समीर पेंढारे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा दहीहंडी समन्वय समिती

न्यायालयाच्या लांबलेल्या सुनावणीमुळे आयोजकांमध्येही संभ्रमाचे आणि निराशेचे वातावरण होते. गोविंदा पथकांच्या बाजूने हा निर्णय नसला तरी सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आम्ही पालन करू. आपली परंपरा, संस्कृती जपत आम्ही हा सण साधेपणाने मात्र उत्साहात साजरा करू. पण जे इव्हेंट म्हणून साजरा करत होते. त्यांनी यातून पळ काढला आहे.
- आ. प्रताप सरनाईक, आयोजक, संस्कृती प्रतिष्ठान

दहीहंडीसंदर्भात न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे, त्याचा मान राखून सण साजरा करणार आहे. दहीहंडीतील थरांची उंची वाढविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून शिथिलता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. ती न झाल्यामुळे गोविंदांमध्ये नाराजी आहे. अर्थात, स्व. आनंद दिघे यांनी सातासमुद्रापलीकडे ओळख निर्माण केलेली दहीहंडीची परंपरा यापुढेही अशीच चालू ठेवणार आहे.
- रवींद्र फाटक, आमदार तथा अध्यक्ष, संकल्प प्रतिष्ठान दहिकाला महोत्सव समिती, ठाणे.

दहीहंडीसाठी जीवघेणा खेळ कधीच केला नाही. दरवर्षी सर्व खबरदारी घेत आमच्या मंडळाकडून उत्सव साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून लहान मुलांना वरच्या थरावर जाण्यास पूर्णपणे बंदी घातलेली आहे. चार थरांपेक्षा अधिक थर लावले जात नाहीत. हिंदुचा धार्मिक उत्सव पुढच्या पिढीलाही माहिती होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही परंपरा अखंड ठेवण्यासाठी हा उत्सव न्यायालयाचा मान राखून यापुढेही सुरुच ठेवणार आहे.
- राजन विचारे, खासदार, ठाणे तथा सल्लागार, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, ठाणे.

हा निर्णय दुर्दैवी आहे. मी केवळ आयोजक नाही. मी लहानपणापासूनच स्वत: गोविंदा म्हणून सहभागी होत असल्याने माझी या उत्सवात इन्व्हॉलमेंट होती. माझ्यासाठी हा खेळ होता. दिशा होती. मात्र या निर्णयानंतर ‘संघर्ष’ची दहीहंडी होणार नाही. रात्री १२ वाजता परंपरेनुसार कृष्णजन्म होईल. नरवीर तानाजी मित्र मंडळाच्यावतीने हंडी बांधून ती फोडली जाईल. पण दिवसभराचा इव्हेंट होणार नाही. काही तरी करायचे म्हणून मी करत नाही. कोणाला जे काही बोलायचे ते बोलू दे. चौथी पास माणसाने मला शिकविण्याचा प्रयत्न करू नये. काळ्या माणसाने गोरे होण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याला गोरे होत येत नसते.
- आ. जितेंद्र आव्हाड, आयोजक, संघर्ष उत्सव समिती

Web Title: 'Conflict' ended, 'culture'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.