संरक्षण क्षेत्रातील उत्पादन व सेवेतील कामगारांचे बंड, खासगीकरणाला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 09:05 PM2018-12-27T21:05:40+5:302018-12-27T21:06:46+5:30
संरक्षण क्षेत्रातील उत्पादन व सेवेचे सरकारकडून खासगीकरण सुरू असल्याचा आरोप करत नव्या वर्षातील २३ ते २५ जानेवारी या काळात तीन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
मुंबई : संरक्षण क्षेत्रातील उत्पादन व सेवेचे सरकारकडून खासगीकरण सुरू असल्याचा आरोप करत नव्या वर्षातील २३ ते २५ जानेवारी या काळात तीन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात देशातील चार लाख कर्मचारी सामील होतील, असा दावा ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनने लोकमतशी बोलताना केला आहे.
फेडरेशनचे महासचिव सी. श्रीकुमार म्हणाले की, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी उत्पादन करत असलेली बहुतांश हत्यारांचे कंत्राट सरकारने खासगी कंपन्यांना दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हत्यारांच्या १०० टक्के उत्पादनाची जबाबदारीही करार करत सरकारने कंपन्यांवर सोपवली आहे. ही बाब गंभीर असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. म्हणूनच सरकारच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी देशातील ४१ कारखाने आणि ५२ कार्यशाळांमधील कर्मचारी व अधिकारी या संपात उतरणार आहेत. फेडरेशनने पुकारलेल्या आंदोलनाला देशभरात संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ४३० संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
फेडरेशनचे मानद सचिव मुथु वीरप्पन म्हणाले की, भाजपा सरकारने मेक इन इंडियाच्या नावाखाली संरक्षण क्षेत्राचे खासगीकरण चालवले आहे. कारण मेक इन इंडियाच्या नावाखालीच २७५हून अधिक हत्यारांचे उत्पादन सरकारने खासगी कंपन्यांना दिले आहे. मात्र ही सर्व उत्पादने आधीपासून संरक्षण क्षेत्रातील कर्मचारीच तयार करत होते. याउलट आयात होणा-या हत्यारांबाबत सरकार काहीच बोलत नाही. सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे खासगी कंपन्या गब्बर होणार असून संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी मात्र बेकार होणार असल्याचा आरोप वीरप्पन यांनी केला आहे.
................................
कंत्राटीकरण थांबवा
सरकारने कायमस्वरूपी भरती बंद करत कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यास सुरूवात केली आहे. या कंत्राटी कामगारांना किमान वेतनही नाकारले जाते. त्यामुळे कामगारांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण होत असून देशाच्या संरक्षणाचा प्रश्नही गंभीर झाल्याचा आरोप फेडरेशनने केला आहे.
............................
त्रैवार्षिक अधिवेशनात शरद पवार!
फेडरेशनचे त्रैवार्षिक अधिवेशन तब्बल ४७ वर्षांनंतर यंदा मुंबईतील अँटॉप हिल येथे होत आहे. २८ ते ३० डिसेंबर कालावधीत होणाºया या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतील. सर्व संघटनांचे तब्बल २ हजार प्रतिनिधी अधिवेशनात उपस्थित असतील, असा दावा फेडरेशनने केला आहे.