Join us  

मेट्रो कारशेडवरून युतीमध्ये मतभेद

By admin | Published: March 13, 2016 4:38 AM

मुंबईकर दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे कारशेड आरे कॉलनीत उभारण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत झाला

मुंबई : मुंबईकर दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे कारशेड आरे कॉलनीत उभारण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत झाला; मात्र आता त्याबाबत सत्ताधारी भाजपा व सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एकाच व्यासपीठावर मेट्रो-३च्या डेपोबाबत परस्परविरोधी मते मांडली. त्यासाठी निमित्त ठरले ते शनिवारी झालेल्या राष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्ट परिषदेचे.जावडेकर यांनी शाश्वत विकासाचा विचार करून आरे कॉलनीत कारशेड उभारल्याने पर्यावरणाचे फारसे नुकसान होणार नसल्याचे सांगत त्याला समर्थन दिले; तर देसाई यांनी त्याला विरोध दर्शवित आरेमध्ये कसलाही विकास होणार नसून, मेट्रोची कारशेड दुसरीकडेच होईल, असे ठामपणे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधारी युतीतील अन्य अनेक विषयांतील विरोध चव्हाट्यावर असताना आता ‘मेट्रो-३’ची त्यामध्ये भर पडली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला मोठे महत्त्व येणार आहे. आपल्या भाषणात सुभाष देसाई म्हणाले, ‘आरे कॉलनीतील कारशेड प्रकरणात जनभावना ऐकून घेण्याची गरज आहे. आमचा कारशेड प्रस्तावाला विरोध असून, या ठिकाणी असा कोणताही विकास केला जाणार नाही. दरम्यान, मेट्रो ३चे कारशेड आरेमध्येच उभारण्याबाबत निर्णय झाला असला तरी त्याला ‘सेव्ह आरे’ आणि ‘वनशक्ती’ने विरोध दर्शवला आहे; तर दुसरीकडे आरेमधील स्थानिक नागरिकांसह काही स्वयंसेवी संस्थांनी त्याचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)आरे कॉलनीतील मेट्रो-३चा संदर्भ देत केंद्रीयमंत्री जावडेकर म्हणाले, ‘या प्रश्नावर शाश्वत मार्गाने उपाय काढता येणे शक्य आहे. नवीन तंत्रज्ञानाद्वारे ५ ते १० वर्षे वयाच्या झाडांचे पुनर्रोपण करता येऊ शकेल. कारशेडसाठी ३५० झाडे तोडली जाणार आहेत; हे योग्य नसले तरी यासाठी विकासही थांबवता येणार नाही. झाडे तोडली जाऊ नयेत हा मुद्दा बरोबर आहे; मात्र त्याचबरोबर विकासही थांबता कामा नये. याला पर्याय म्हणून आणखी किती झाडे लावता येतील याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे या परिसरातील चांगल्या झाडांचे दुसरीकडे पुनर्रोपण करता येईल; आणि हाच खरा शाश्वत विकास असेल.